
उमेश गायगवळे मुंबई
“गरिबांच्या घरात जन्मलो, गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि ठरवलं, या समाजात शिक्षणाचा दिवा पेटवायचाच.”
ही वाक्यं ज्या व्यक्तीच्या जीवनाचा गाभा ठरली, त्या म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ कर्मवीर भाऊराव पाटील.
अन्यायाने बदलले आयुष्य
भाऊराव पाटील यांच्या आयुष्याची दिशा एका अन्यायकारक घटनेने बदलून टाकली. सन 1906 मध्ये ते कोल्हापुरात शिक्षण घेत होते. त्यावेळी ब्रिटनच्या सम्राट एडवर्ड सातव्याच्या पुतळ्याला डांबर फासल्याची घटना घडली. निर्दोष असूनही या कृत्याचा खोटा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तुरुंगवासाची शिक्षा झाली. आयुष्यभर सत्यासाठी लढणाऱ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या भाऊरावांना हे अत्यंत असह्य झाले. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. त्या मृत्यूच्या छायेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या विचारविश्वात प्रचंड परिवर्तन घडले.
त्यांना जाणवले “जर माझ्यासारख्या शिक्षिताला न्याय मिळत नसेल, तर अशिक्षित, गरीब, वंचितांचा आवाज कोण ऐकणार?” या प्रश्नाने त्यांच्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले.
रयत शिक्षण संस्थेचा उदय
हिच वेदना आणि जिद्दीचा संगम पुढे १९१९ मध्ये साताऱ्याच्या काले या खेड्यात एक मोठ्या शैक्षणिक क्रांतीत परिवर्तित झाला. येथे भाऊराव पाटील यांनी स्थापन केली “रयत शिक्षण संस्था”
त्या काळी शिक्षण हे उच्चवर्गीयांचे, श्रीमंतांचे मक्तेदारीचे साधन होते. गरीब शेतकरी, कामगार, मागासलेल्या समाजातील मुले शाळेच्या दारातसुद्धा जाऊ शकत नव्हती. पण कर्मवीरांनी ठाम शब्दात सांगितले..
“शिक्षण हे सर्वांसाठी आहे; जातीसाठी, धर्मासाठी नाही.”
रयत शिक्षण संस्थेच्या पाया घातला गेला ‘कमवा आणि शिका’ या क्रांतिकारी तत्त्वज्ञानावर. गरीब विद्यार्थी शिकताना काम करतील, शेतात शाळेच्या परिसरात, छोट्या-मोठ्या कामांत, आणि त्यातून शिक्षणासाठी पैसे जमवतील. यामुळे हजारो गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. आज २०२५ मध्ये या संस्थेला १०६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
अविस्मरणीय त्याग
संस्थेच्या कार्यासाठी निधी जमवताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचाही विचार केला नाही. पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी अंगावरील दागिने विकून संस्थेला दिले. हे केवळ आर्थिक साहाय्य नव्हते, तर शिक्षणासाठीचा त्यागाचा दीपस्तंभ होता.
भाऊराव प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून सांगत…
“पोट भुकेले असेल तरी चालेल, पण डोकं रिकामं राहता कामा नये. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार नाही.”
त्यांच्या या अथक धडपडीने लाखो कुटुंबांची पिढी बदलली.
उदार सहकार्य
या कार्यात अनेक समाजहितैषी मंडळी मदतीला धावून आली. शेतकरी, व्यावसायिक, समाजधुरीण, अगदी सामान्य कष्टकरीही रयत शिक्षण संस्थेला हातभार लावत होते. कर्मवीरांच्या प्रामाणिकपणाने, त्यागाने आणि ध्येयवेड्या कार्याने सर्वांचे मन जिंकले.
आजची रयत शिक्षण संस्था
आज रयत शिक्षण संस्था म्हणजे केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर एक वटवृक्ष आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ४५० हून अधिक शाळा, महाविद्यालये आणि शाखा कार्यरत आहेत. लाखो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
सध्या या संस्थेचे नेतृत्व प्रा. भाऊसाहेब आर्वी (अध्यक्ष) आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील (संचालक मंडळ) यांच्या हाती आहे. भाऊरावांनी पेरलेले शिक्षणाचे बीज आज एका विशाल वटवृक्षात रुपांतरले आहे.
काळाचा बदल, एक कटू वास्तव
आज अनेक शिक्षणसंस्था स्थापन झाल्या आहेत. पण त्यातल्या बहुतेक नाममात्र आहेत. शेकडो पटीने वाढलेल्या डोनेशनच्या बदल्यात शिक्षण दिले जाते. गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. सरकार कितीही जाहिराती करीत असले तरी गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी खरी मदत मर्यादित आहे. कर्जांच्या आणि शिष्यवृत्तींच्या घोषणांपेक्षा वास्तव निराशाजनक आहे.
या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य अधिक अधोरेखित होते. त्यांनी दाखवून दिले की, शिक्षण हे दानधर्म नाही, तर प्रत्येकाचे हक्काचे आहे.
समाजक्रांतीचे प्रेरणास्थान
२२ सप्टेंबर हा दिवस फक्त एका महान व्यक्तीची जयंती नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे स्मरण आहे. कर्मवीरांनी शिकवले,
“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचले, तरच खरी स्वातंत्र्याची सकाळ उजाडेल.”
आज आपण आधुनिक शिक्षणाच्या रद्द गडगडाटात उभे असलो, तरी त्या पाया मागे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे रक्त, घाम आणि अश्रू आहेत. म्हणूनच ते केवळ शिक्षक नव्हते, तर समाजाला नवी दिशा देणारे कर्मवीर होते.