मुंबई प्रतिनिधी
फाल्गुन पौर्णिमेला मंगळवारी (३ मार्च) वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण होत असून ते भारतात दिसणार आहे. त्यामुळे पारंपरिक धार्मिक आचारांनुसार सुतककाळ पाळला जाणार आहे. विशेष म्हणजे, ग्रहणाच्या अवस्थेतच चंद्र उगवणार असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत लालसर छटा असलेला ‘ब्लड मून’ पाहण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.
सुतककाळ सकाळी ६.२० पासून
पूर्ण चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे ३ तास २७ मिनिटांचा असून सुतककाळ ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो. त्यानुसार मंगळवारी सकाळी ६.२० वाजल्यापासून सुतकाचे नियम लागू मानले जातील. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि शुभकार्ये टाळली जातात. ग्रहणाच्या स्पर्श, मध्य व मोक्षकाळी स्नान करण्याची धार्मिक परंपरा आहे.
सुतककाळातील धार्मिक आचार
सुतक सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थांमध्ये तुळशी किंवा कुश ठेवण्याची प्रथा आहे. सुतककाळात अन्न शिजवणे किंवा सेवन टाळावे, असे मानले जाते. पूजा, हवन, यज्ञ, नवे उपक्रम किंवा मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत, अशीही श्रद्धा आहे.
गर्भवतींसाठी पारंपरिक सूचना
ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी घराबाहेर जाणे टाळावे, धारदार वस्तूंचा वापर करू नये आणि मंत्रजप, ध्यान किंवा धार्मिक ग्रंथवाचन करावे, अशी लोकपरंपरा सांगते.
ग्रहणकाळात काय करावे?
ग्रहणाच्या दिवशी सकाळी स्नान व देवपूजा करून देवस्थान झाकून ठेवतात. सुतककाळात देवप्रतिमांना स्पर्श न करण्याची पद्धत आहे. ग्रहणाच्या वेळी ‘ॐ नमः शिवाय’, महामृत्युंजय किंवा गायत्री मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे. ग्रहणानंतर स्नान, स्वच्छता आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत दर्शनाचा कालावधी
ग्रहणाच्या अवस्थेतच चंद्रोदय होत असल्याने प्रत्येक शहरात दृश्यमान कालावधी वेगळा असेल.
मुंबई – सायं. ६.४५; दर्शन सुमारे ३ मिनिटे
पुणे – सायं. ६.४१; दर्शन सुमारे ७ मिनिटे
नाशिक – सायं. ६.४०; दर्शन सुमारे ८ मिनिटे
नागपूर – सायं. ६.१८; दर्शन सुमारे ३० मिनिटे
छत्रपती संभाजीनगर – सायं. ६.३४; दर्शन सुमारे १४ मिनिटे
कोल्हापूर – सायं. ६.४०; दर्शन सुमारे ८ मिनिटे
खग्रास अवस्थेत चंद्र क्षितिजाजवळ दिसत असल्याने त्याचा रंग अधिक गडद लालसर भासतो. त्यामुळे ‘ब्लड मून’चे दृश्य मर्यादित कालावधीत अनुभवता येणार आहे.
टीप : ग्रहणदर्शनाचा कालावधी स्थानिक क्षितिज, हवामान व उंच इमारती/डोंगररांगांवर अवलंबून बदलू शकतो.
धार्मिक श्रद्धेनुसार सुतक व ग्रहणकाळाचे पालन करणाऱ्यांनी सकाळी ६.२० पूर्वी आवश्यक तयारी करून ठेवावी, असे आवाहन ज्योतिष व धर्माचार्यांनी केले आहे. खगोलप्रेमींसाठी मात्र वर्षातील पहिल्या खग्रास चंद्रग्रहणाचे अल्पावधी दर्शनही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.


