लातूर, प्रतिनिधी
शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक, समाजचिंतक आणि माजी खासदार डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे (९१) यांचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक अभ्यासू, पुरोगामी व वैचारिक नेतृत्व हरपले आहे. ‘लातूर पॅटर्न’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक यश मिळवून देणारे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख देशभर होती.
त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता मूळगाव कवठा (ता. औसा, जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्यचळवळीवर त्यांनी सखोल संशोधनात्मक लेखन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणीची त्यांनी सातत्याने मांडणी केली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे संस्थापक व पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची पायाभूत रचना उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. विद्यापीठ स्थापनेपासून शैक्षणिक विस्तारापर्यंतच्या प्रक्रियेत त्यांनी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिले. मराठवाड्यातील सर्वसामान्य तरुणांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यामागे त्यांचे कार्य निर्णायक ठरले.
लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधा यांवर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या पुढाकारामुळे शहराला स्वच्छतेसाठी राज्यस्तरीय गौरवही प्राप्त झाला. पुढे त्यांनी संसदीय राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली.
शिक्षण क्षेत्रात देशभर गाजलेल्या ‘लातूर पॅटर्न’ची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली. शिस्तबद्ध अध्ययन, नियोजनबद्ध सराव, निकालाभिमुख अभ्यासपद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन या घटकांवर आधारित हा पॅटर्न पुढे राष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च यश मिळवून देण्याचा पाया त्यांनी घातला.
साहित्य, शिक्षण, समाजप्रबोधन, कृषि आणि सार्वजनिक जीवन अशा विविध क्षेत्रांत त्यांचा मुक्त संचार होता. अनेक ग्रंथलेखन, व्याख्याने आणि शैक्षणिक उपक्रमांतून त्यांनी समाजजागृती केली. मराठी भाषेबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. नांदेडमधील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह २०२५चे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी अलीकडेपर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला होता. शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनवादी विचारांचे ते अखेरपर्यंत ध्वजवाहक राहिले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.


