
लातूर प्रतिनिधी
लातूर शहरात मध्यरात्री रक्तरंजित थरार उडाला. गाडीला कट का मारला, एवढ्याशा कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, तर सोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे लातूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यासाठी आलेले अनमोल कवठे व सोबतीची सोनाली भोसले यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. पाच नंबर चौकातून औसा बायपासकडे जात असताना गाडीला कट मारल्याच्या कारणावरून आरोपी शुभमने अनमोलवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गळ्यावर आणि मानेवर वार झाल्याने अनमोलचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सोनाली भोसले हिच्यावर देखील चाकूने पोट व पाठीवर वार करण्यात आले. ती गंभीर जखमी असून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत अनमोल कवठे हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) याचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणीसह पाच गुन्हे दाखल होते आणि त्याला तडीपारही करण्यात आले होते, अशी नोंद पोलिसांनी दिली.
घटनेनंतर आरोपी शुभमला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमका उद्देश काय, आणि यामागे कुणाचा मोठा मास्टरमाइंड आहे का, याचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे.
या रक्तरंजित घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.