लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवाडा रस्त्यावर एका तरुणाला पोत्यात बांधून त्याच्याच कारसह जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.
औसा तांडा येथील रहिवासी गणेश चव्हाण वय अंदाजे ३०, असे मृत तरुणाचे नाव असून तो आयसीआयसीआय बँकेत वसुली एजंट म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री डायल ११२ वर वानवाडा रोड परिसरात कार पेटल्याची माहिती मिळाल्यानंतर औसा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे एक कार आगीत जळत असल्याचे आढळून आले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणल्यानंतर गाडीच्या आत एक पूर्णतः जळालेला मृतदेह सापडला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृतदेह पोत्यात बांधलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गणेश चव्हाण यांची आधी हत्या करून नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कार पेटवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही प्राथमिक पुराव्यांवरून त्यांना जिवंत अवस्थेतच पोत्यात बांधून कार पेटवण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गणेश चव्हाण यांच्या कामाच्या स्वरूपामुळे आर्थिक व्यवहार, वसुलीतील वाद किंवा वैयक्तिक शत्रुत्व यासंबंधीचे सर्व पैलू तपासात घेतले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या निर्घृण घटनेमागील नेमका हेतू आणि आरोपी कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. पुढील तपास औसा पोलिस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


