
लातूर प्रतिनिधी
महाविद्यालयीन जीवनात सुरू झालेलं प्रेम अखेर न्यायालयीन दाराशी येऊन ठेपलं आहे. एकाच कॉलेजात शिकताना जुळलेलं नातं, पुढे पुण्यातील शिक्षण, त्यानंतर एकाच कंपनीत नोकरी… या सगळ्या प्रवासात तब्बल दहा वर्षे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरच्या सोना नगरमधील रोहित नागनाथ वंगे (२८) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याच वर्गातील तरुणीसोबतचे हे नातं अखेर गुन्हेगारीकडे वळले आहे.
२०१५ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना आरोपीने पीडितेला प्रकाश नगरातील घरी बोलावून पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी “लग्न करणार” अशा आणाभाका घेतल्या. त्यानंतर पुण्यात उच्च शिक्षणासाठी दोघेही गेले. तिथेही आरोपीने वारंवार संबंध ठेवले. नंतर दोघेही एकाच कंपनीत नोकरीला लागले. तेथेही संबंधांची मालिका सुरूच राहिली.
मात्र, गेल्या १९ मे रोजी आरोपीने लग्नाचा विषय काढत “जात आडवी येत आहे, घरच्यांचा विरोध आहे” अशी कारणे सांगून लग्नास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेशी संपर्क तोडला. धास्तावलेल्या पीडितेने आई व भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करूनही जवळपास महिनाभर पीडित व तिच्या आईला चकरा मारायला लावल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीही दीर्घकाळ टाळण्यात आली. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर तपासणी झाली आणि आरोपीविरुद्ध ३१ मे २०२५ रोजी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.