लातूर प्रतिनिधी
जिद्द, संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर निवडणूक जिंकणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे (वय अंदाजे ४०) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे अचानक शाहूताई कांबळे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना अहमदपूर येथील रुग्णालयात नेले. मात्र पहाटेची वेळ असल्याने अनेक खासगी रुग्णालयांत वैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध नव्हती. परिणामी उपचारास विलंब झाला. नंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक पातळीवर असे सांगितले जात आहे की, वेळेत – विशेषतः १५ ते २० मिनिटे आधी चार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. या घटनेमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संघर्षातून आलेला राजकीय प्रवास
शाहूताई कांबळे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता. २०१७ साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना अवघ्या १२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यांनी हार मानली नाही. जनतेशी असलेला थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांबाबतची तळमळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच झालेल्या अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून विजयी झाल्या. मर्यादित आर्थिक परिस्थितीतही त्यांनी निवडणूक लढवली आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांचा विजय झाला. हा विजय त्यांच्या जिद्दीचा आणि चिकाटीचा प्रतीक मानला जात होता.
शोक व्यक्त
नगरसेविका शाहूताई कांबळे यांच्या निधनाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पक्षासाठी आणि वैयक्तिक पातळीवर हा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण प्रभागात आणि अहमदपूर शहरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहूताई कांबळे या साध्या स्वभावाच्या, पण ठाम मतांच्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. निवडणुकीनंतर त्यांनी विकासकामांसाठी आराखडे तयार करण्यास सुरुवात केली होती. मात्र नियतीने त्यांना मिळालेला जनादेश फार काळ उपभोगता आला नाही.
अकाली गेलेल्या या लोकप्रतिनिधीच्या निधनाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या सामान्य, संघर्षशील कार्यकर्त्यांच्या आशा आणि स्वप्नांवर जणू विरजण पडले आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


