लातूर प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी वर्गावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती, वाढत्या कर्जबाजारीपणा आणि अपुऱ्या मदतीच्या सावटाने पुन्हा एकदा जीव घेतला आहे. लातूर जिल्ह्यातील नागरसोगा (ता. लातूर) येथील बिभीषण पंढरीनाथ साळुंके (वय ३३) या तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री स्वतःला पेटवून घेतले. सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अवघी एक एकर शेती, वृद्ध आई आणि अंध वडील, अशी बिकट परिस्थिती असलेल्या साळुंके कुटुंबावर परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान ओढवले होते. शेतीत काहीच उत्पादन निघाले नाही, त्यात कार्यकारी सोसायटीसह खाजगी कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. या आर्थिक विवंचनेतून आणि अनिश्चित भवितव्याच्या विचाराने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
रविवारी रात्री साळुंके यांनी स्वतःच्या घरात पेटवून घेतले. आगीचा भडका एवढा प्रचंड होता की त्यांचे शरीर गंभीररीत्या भाजले. तत्काळ त्यांना लातूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
बिभीषण साळुंके यांच्या पश्चात वृद्ध आई, अंध वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. “शेतीत नुकसान, सरकारकडून मदतीचा अभाव आणि कर्जबाजारीपणामुळे ते खूप नैराश्यात होते,” असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नुकसानीचे वास्तव आणि शासनाच्या मदतीच्या उशिराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


