
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता कार्यालयीन शिस्त अधिक कठोर होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात 10 सप्टेंबर रोजी नवीन परिपत्रक जारी केले असून, कार्यालयात जाताना गळ्यात ओळखपत्र स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने लावणे सर्व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
या छोट्याशा नियमाचे पालन न करणाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. सरकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना कर्मचारी सहज ओळखता यावेत आणि गैरसोय होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वीही याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळेच आता परिपत्रकाद्वारे कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे.
विभागप्रमुख आणि कार्यालयप्रमुखांना याची जबाबदारी देण्यात आली असून, कर्मचारी नियमांचे पालन करत आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे शासकीय कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, बेसिस्त व बेजबाबदार वृत्तीवर अंकुश बसण्यास हातभार लागेल.