वर्धा प्रतिनिधी
८ मार्च म्हणजे जगभर साजरा होणारा जागतिक महिला दिन. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या हक्कांचा आणि समानतेच्या लढ्याचा संदेश देणारा हा दिवस. मात्र याच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळे विदर्भातील काही महिलांसाठी हा दिवस आयुष्यभर विसरता न येणारा ठरला आहे. महिला दिन साजरा करण्यासाठी दिल्लीत गेलेल्या महिलांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय महिला काँग्रेसतर्फे दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षनेत्या अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार होते. देशभरातील अनेक महिला कार्यकर्त्या त्यासाठी दिल्लीत पोहोचल्या होत्या. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील काही महिलाही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
मात्र ७ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटवर या दरवाढीचा मोठा परिणाम होणार असल्याचा आरोप करत महिलांनी तात्काळ निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला. यानंतर महिलांचा एक गट केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जमा झाला.
निषेध आंदोलनात धावपळ, पोलिसांची कारवाई
महिलांनी शांततामय पद्धतीने घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळातच दिल्ली पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी महिलांना हटवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच तणावाचे वातावरण निर्माण झाले. धावपळ उडाली. काही स्थानिक महिलांनी तेथून निघून जाणे पसंत केले, तर दिल्लीबाहेरून आलेल्या अनेक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विदर्भातील काही महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्या थेट पोलिसांच्या गाड्यांमधून ठाण्यात नेण्यात आल्या. महिलांनी वारंवार “आमचा गुन्हा काय?” असा सवाल केला; मात्र त्यांना ठोस उत्तर मिळाले नाही, असा आरोप करण्यात आला.
पाणीही मिळाले नाही, महिलांची व्यथा
दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास महिलांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला “तासाभरात सोडून देऊ” असे सांगण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंतही सुटका न झाल्याने महिलांची चिंता वाढली. सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते, तरीही बराच वेळ अन्न-पाणी मिळाले नाही, अशी तक्रार महिलांनी केली.
वर्धा येथील महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव अर्चना बोमले यांनी या प्रसंगाबद्दल बोलताना सांगितले की, “हा अनुभव अत्यंत भयानक होता. सरकारच्या निर्णयाचा अहिंसक निषेध करणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला.”
त्या पुढे म्हणाल्या, “पोलिस आल्यावर अचानक धावपळ उडाली. माझी चप्पल तुटली. काही महिला पडल्या. त्यानंतर आम्हाला पकडून थेट मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीही झाली नाही. ‘सोडणार केव्हा?’ असे विचारले तर अधिकारी टाळाटाळ करत होते.”
‘वरून दबाव आहे’, पोलिसांचे उत्तर
अर्चना भोमले यांच्या मते, महिलांनी वारंवार सोडण्याची मागणी केली असता काही पोलिसांनी “वरून खूप दबाव आहे, त्यामुळे आत्ताच सोडता येणार नाही” असे सांगितले. त्याचवेळी “अल्का लांबा कुठे आहेत, त्यांनाही अटक करावी लागेल” अशी चर्चा पोलिसांमध्ये सुरू असल्याचे महिलांनी ऐकले, असेही त्यांनी सांगितले.
दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत महिलांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नव्हते, असा आरोप त्यांनी केला. सकाळपासून उपाशी असलेल्या महिलांची अवस्था त्यामुळे अधिकच बिकट झाली.
रात्री उशिरा सुटका
सायंकाळ उलटून रात्रीचे आठ वाजले तरी सुटकेची चिन्हे दिसत नव्हती. घरापासून शेकडो किलोमीटर दूर असताना पोलिस ठाण्यात बसून राहावे लागल्याने महिलांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर रात्री उशिरा पक्षाकडून नियुक्त केलेले वकील पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू झाली आणि महिलांची सुटका करण्यात आली.
“अशी वेळ कोणत्याही महिलेवर येऊ नये”
या घटनेबाबत बोलताना अर्चना भोमले म्हणाल्या, “आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रसंग अनुभवला. घरापासून इतक्या दूर, तेही पोलिस ठाण्यात अडकून पडल्याने खूप भीती वाटत होती. अखेर रात्री बाहेर पडलो तेव्हा जीव भांड्यात पडला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भारतातच असा अनुभव घ्यावा लागणे अत्यंत दुर्दैवी आहे.”
महिलांच्या सन्मानाचा संदेश देणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. महिलांच्या हक्कांबद्दल बोलणाऱ्या देशात आंदोलन करणाऱ्या महिलांना असा अनुभव यावा का, असा सवाल आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर उपस्थित होऊ लागला आहे.


