
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घरांचे दर आकाशाला भिडलेले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांसाठी म्हाडा हे घर मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरते. गेल्या काही वर्षांत म्हाडाकडून अनेक वसाहतींचा पुनर्विकास करण्यात आला असून त्यातून स्थानिकांना मोठी व सुधारित घरे मिळाली आहेत.
आता म्हाडा मुंबई मंडळाने आपला मोर्चा दक्षिण मध्य मुंबईकडे वळवला असून काळाचौकी वसाहतीचा पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा जाहीर करण्यात आली असून ओबेरॉय ग्रुप, महिंद्रा लाइफस्पेस आणि एमजीएम अॅग्रो या तीन मोठ्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. पुढील टप्प्यात आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहेत.
काळाचौकी वसाहतीत सध्या 133593 चौरस मीटर क्षेत्रफळावर 48 इमारती आहेत. त्यात 208 चौरस फूट क्षेत्रफळाची 3410 घरे असून सुमारे 15 हजार लोक राहतात. पुनर्विकासानंतर येथील घरांचे क्षेत्रफळ तिप्पट वाढणार असून 635 चौरस फूट इतकी घरे रहिवाशांना मिळतील.
या प्रकल्पातून स्थानिक रहिवाशांना तात्पुरत्या निवासाची सोय करण्याची जबाबदारी निवड झालेल्या विकासकावर राहणार आहे. पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज घरे मिळाल्यामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार असल्याची अपेक्षा आहे.