पुणे प्रतिनिधी
पुणे : हडपसर–सासवड रस्त्यालगत दिवे घाट पायथ्याशी वडकी परिसरात सापडलेल्या बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने केला असून प्रकाश विभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.
३ मार्च २०२६ रोजी काची कंपनीजवळील मोकळ्या जागेत ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर संशयित म्हणून प्रकाश माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने महिलेवर जबरदस्तीने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्याने संतापाच्या भरात तिचा गळा दाबून तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे, अनिल जामगे तसेच महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे यांनी ही कामगिरी बजावली.


