सातारा प्रतिनिधी
सातारा : धुळवडीच्या पार्श्वभूमीवर वाढीव गस्तीदरम्यान वाठार पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकलींसह एका संशयिताला ताब्यात घेत एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाठार बिचुकले रोडवर करण्यात आली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळवडीच्या पार्श्वभूमीवर हद्दीत कडक पेट्रोलिंग व गुन्हेगार तपासणी सुरू होती. त्या वेळी सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या आदेशाने डी.बी. पथक गस्त घालत असताना विना नंबरप्लेटची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल चालवत असलेला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळला.
पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव दत्तात्रय धनसिंग पवार (वय ३३, रा. बिचुकले, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे सांगितले. मोटारसायकलबाबत समाधानकारक माहिती न देता टाळाटाळ केल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यानंतर त्याच्या घरासमोर आणखी दोन मोटारसायकली आढळून आल्या. तिन्ही दुचाकींना नंबरप्लेट नसल्याने आणि मालकी हक्काचा पुरावा न दाखवता आल्याने त्या चोरीच्या असल्याचा संशय बळावला.
पोलिसांनी तिन्ही मोटारसायकली जप्त केल्या. त्यामध्ये होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न (एमएच १२ पीबी २७९९), हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल (एमएच १२ एचयू ४३८२) आणि स्प्लेंडर प्रो ड्रीम (एमएच १२ केएस ५३३४) या दुचाकींचा समावेश असून एकूण सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपासात या मोटारसायकली हडपसर पोलीस ठाणे (पुणे शहर) हद्दीतून चोरीला गेल्याचे समोर आले असून त्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, सहपोलीस फौजदार बुआसो वाघमारे, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, महिला पोलीस नाईक गौरी कदम, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत गोरे, विठ्ठल काळे आणि प्रथमेश अलगुडे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे करत आहेत.


