
मुंबई प्रतिनिधी
टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री करिष्मा शर्मा हिने सोशल मीडियावर स्वतःसोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव उघड केला आहे. मुंबई लोकलमधून प्रवास करताना तिला अपघात झाला असून सध्या ती रुग्णालयात उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा पश्चिम रेल्वे मार्गावर मित्रांसोबत प्रवास करत होती. लोकल सुरू होताच तिचे मित्र गाडीत चढू शकले नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या करिष्माने धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेत तिच्या डोक्याला व पाठीस दुखापत झाली असून तीव्र वेदना जाणवत आहेत.
“मी काल चर्चगेटला शूटसाठी जाणार होते. साडी नेसून रेल्वेत चढले, पण माझे मित्र चढू शकले नाहीत. मी घाबरले आणि गाडीतून उडी मारली. त्यामुळे माझ्या डोक्याला मार लागला,” अशी माहिती करिष्माने इंस्टा स्टोरीवर दिली.
तिच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी तिला एक दिवस देखरेखीखाली ठेवले आहे. “कालपासून फार वेदना होत आहेत, पण मी धीट आहे. मी लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करा,” असे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.
दरम्यान, करिष्माच्या एका मैत्रीणीने तिचा रुग्णालयातील फोटो शेअर करत घडलेल्या घटनेबद्दल धक्का व्यक्त केला आहे. “करिष्माला काहीच आठवत नाही. ती रेल्वेतून पडल्याचे आम्ही पाहिले आणि तिला रुग्णालयात आणले. डॉक्टर तपासणी करत आहेत. ती लवकर बरी व्हावी,” असे मैत्रीणीने लिहिले.
या घटनेमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये काळजीची भावना असून सोशल मीडियावर तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त होत आहेत.