
वसई प्रतिनिधी
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने तुंगारेश्वर दर्शनासाठी गेलेल्या सहा जणांच्या तरुणांच्या ग्रुपमध्ये दोन तरुणांनी पाण्यात उतरून नाहक प्राण गमावले. या धक्कादायक घटनेने नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांची नावं सचिन यादव (वय 18) आणि हिमांशू विश्वकर्मा (वय 18) अशी आहेत.
तुंगारेश्वर येथे देवाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना, मांडवी भागातील नदीपात्राजवळ पाण्यात उतरल्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही. खेळता खेळता एकाचा पाय घसरला आणि धक्का लागून दुसऱ्यालाही ओढले गेले. पाहता पाहता दोघं पाण्यात बुडाले.
पाण्यात बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी त्यांच्या एका मित्राने प्रयत्न केला. मात्र, त्यालाही जीवावर बेतण्याची वेळ आली होती. इतर मित्रांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळेत बाहेर काढले.
सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे तुंगारेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी त्यांना पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सचिन व हिमांशू यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ‘एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची वेदना देतो’ हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पावसाळ्यात नदी, धबधब्यांपासून दूर राहा – पोलीस प्रशासनाचा इशारा
सध्या पावसाळा सुरू असून, अशा अनोळखी व धोका असलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन धाडस करणे जीवावर बेतू शकते. तरुणांनी सेल्फी, मस्ती किंवा मोह टाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.