पुणे प्रतिनिधी
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत हिंजवडीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या अत्याधुनिक गांजा शेतीचा पर्दाफाश केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घरातच उच्च दर्जाच्या गांजाची लागवड केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दोन एमबीए पदवीधरांसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सुमित देदवाल आणि अक्षय मेहर अशी अटक करण्यात आलेल्या दोन सुशिक्षित आरोपींची नावे असून ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. या दोघांनी हिंजवडीतील फ्लॅटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवून ‘ओजी-कुश’ या उच्च प्रतीच्या गांजाची लागवड सुरू केली होती. तापमान, प्रकाश आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी एआय-आधारित प्रणालीचा वापर करण्यात येत होता.
पोलिस तपासात आरोपींनी लागवडीसाठी लागणारे साहित्य डार्क वेब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक व्यवहारांसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.
छाप्यात तब्बल २.८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा, हॅश आणि सीबीडी ऑईल यांचा मोठा साठा आढळून आला आहे. पुढील तपासात या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. मुंबईतील मालय राजेश देलिवाला आणि स्वराज भोसले या दोन पुरवठादारांनाही अटक करण्यात आली आहे. हा माल थायलंडमधून भारतात आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये सुशिक्षित तरुणांनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सुरू केलेल्या या बेकायदेशीर धंद्यामुळे शहरात खळबळ उडाली असून या ड्रग्ज रॅकेटचे आणखी दुवे शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.


