
वसई प्रतिनिधी
नायगाव (पूर्व) येथील नवकार इमारतीमध्ये हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ४ वर्षांची अन्विका प्रजापती ही चिमुरडी बाराव्या मजल्यावरून खाली पडून मृत्युमुखी पडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं हे दृश्य अंगावर शहारे आणणारं आहे.
Trigger warning ⚠️
4 yr old girl falls to her death from 12th floor. CCTV footage shows her mother had briefly seated her on a shoe rack near an open window. Police have registered a case of accidental death#Mumbai pic.twitter.com/2LJoJTvy2W
— Nabila Jamal (@nabilajamal_) July 25, 2025
प्राप्त माहितीनुसार, अन्विका आपल्या कुटुंबियांसोबत नवकार इमारतीत राहत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घराच्या बाहेर चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर अन्विकाला बसवण्यात आलं होतं. खेळता खेळता ती जवळच्याच खिडकीजवळ गेली आणि क्षणार्धातच तिचा तोल गेल्याने ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली कोसळली.
या भीषण घटनेनंतर इमारतीतील काही रहिवाशांनी तात्काळ पायऱ्या उतरून अन्विकाला उचललं आणि वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच अन्विकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घराबाहेर घडल्याने निष्काळजीपणाचा कोन तपासण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून नायगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
या अपघातामुळे अन्विकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकही सुन्न झाले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पालकांनी लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.
शहरांतील उंच इमारतीत राहणाऱ्या पालकांसाठी ही घटना धोक्याची घंटा आहे. घरातील खिडक्या, गॅलरी यांसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहेत. निष्काळजीपणामुळे बालमृत्यू होणे ही अतिशय वेदनादायक बाब आहे.