लंडन:
भारतात बँकांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी ठेवून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मल्ल्याच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य आणि हाय-प्रोफाइल पार्टीमुळे केवळ त्यांच्या आलिशान जीवनशैलीवरच नव्हे, तर भारतातील न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा आणि प्रत्यार्पण प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Thank you to @LalitKModi for hosting a fabulous pre 70th Birthday party in honor of @TheVijayMallya last night at his beautiful London Home pic.twitter.com/Qb5G3Xa0YB
— Jim Rydell (@jim_rydell) December 17, 2025
१८ डिसेंबर २०२५ रोजी विजय मल्ल्या ७० वर्षांचा झाला. या पार्श्वभूमीवर ललित मोदी यांनी लंडनमधील अतिशय प्रतिष्ठित आणि महागड्या ‘बेलग्रेव्ह स्क्वेअर’ येथील आपल्या आलिशान निवासस्थानी मल्ल्यासाठी ‘प्री-बर्थडे पार्टी’चे आयोजन केले होते. या पार्टीत दोघेही एकत्र दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
‘किंग ऑफ गुड टाइम्स’चा झगमगता स्वॅग
या पार्टीचे निमंत्रण पत्रिकाच चर्चेचा विषय ठरली. निमंत्रणावर विजय मल्ल्याचे कॅरिकेचर छापण्यात आले होते आणि त्यावर ठळक अक्षरात ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असा उल्लेख करण्यात आला होता. एकेकाळी लक्झरी, ऐषआराम आणि महागड्या पार्ट्यांसाठी ओळखला जाणारा मल्ल्या आजही त्याच ‘स्वॅग’मध्ये असल्याचे या निमंत्रणातून दिसून येते. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर जिम रिडेल यांनी या पार्टीचे फोटो शेअर केल्यानंतर ही खासगी समजली जाणारी पार्टी सार्वजनिक चर्चेचा विषय ठरली.
उद्योगविश्वासह कला-सिनेविश्वातील दिग्गजांची उपस्थिती
या हाय-प्रोफाइल सोहळ्याला केवळ उद्योगविश्वातील व्यक्तीच नव्हे, तर कला, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंतांनी उपस्थिती लावली. बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. याशिवाय हॉलिवूड अभिनेता इद्रिस एल्बा, भारतीय फॅशन डिझायनर मनोविराज खोसला, आंतरराष्ट्रीय मॉडेल्स आणि कलाकारही या पार्टीत सहभागी झाले होते. महागडी पेये, लाईव्ह म्युझिक, झगमगती सजावट आणि उच्चभ्रू पाहुण्यांची रेलचेल पाहता, हे दोघे भारतात आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली फरार आहेत, असे जाणवणे कठीणच होते.
जुनी मैत्री, जुने वाद
ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांची मैत्री अनेक वर्षांची आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात दोघांचे संबंध अधिक दृढ झाले. यापूर्वीही दोघे एकमेकांच्या खासगी कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. सध्या दोघेही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास असून भारतातील तपास यंत्रणांच्या आवाक्याबाहेर आहेत. भारतात मल्ल्याविरोधात बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत, तर ललित मोदींवरही आर्थिक अनियमिततेचे आरोप प्रलंबित आहेत.
सामान्य नागरिकांमध्ये संताप
या पार्टीचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतात सामान्य नागरिक कर्जाच्या हप्त्यांसाठी झगडत असताना, शेतकरी आणि मध्यमवर्ग आर्थिक विवंचनेत असताना, हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारे उद्योगपती परदेशात राजेशाही थाटात उत्सव साजरे करत असल्याचे चित्र अनेकांना अस्वस्थ करणारे आहे.
प्रत्यार्पण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे भारत आणि ब्रिटनदरम्यान सुरू असलेल्या प्रत्यार्पण प्रक्रियेच्या प्रभावीतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून सुटून परदेशात मुक्तपणे फिरणारे आणि सार्वजनिकरीत्या ऐषआरामात वावरत असलेले हे उद्योगपती भारतीय न्यायव्यवस्थेला थेट आव्हान देत आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विजय मल्ल्याच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या झगमगत्या पार्टीमुळे एक गोष्ट मात्र पुन्हा अधोरेखित झाली आहे. भारतामध्ये आर्थिक गुन्ह्यांबाबत कठोर कारवाई आणि प्रत्यार्पण प्रक्रियेची गती वाढवण्याची गरज आजही तितकीच तीव्र आहे.


