बेलापूर प्रतिनिधी
सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडिओ केवळ दृश्यांमुळे नव्हे, तर त्यामागील दावे आणि कथेमुळे चर्चेचा विषय ठरतात. सध्या असाच एक व्हिडिओ नवी मुंबईतील बेलापूर मेट्रो स्टेशन परिसरातील असल्याचे सांगितले जात असून, त्यातील वृद्ध महिलेच्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. एकेकाळी ऐशोआरामाचं जीवन, फाडफाड इंग्लिश, स्वतःची विमान कंपनी आणि दिवंगत भारतीय क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा, आणि आज भीक मागण्याची वेळ, असा हा विरोधाभासी प्रवास असल्याचे त्या व्हिडिओतून समोर येते.
किस्मत आपको कहां से कहां पहुंचा देती है यह एक बड़ा उदाहरण है आपके सामने देश के मशहूर क्रिकेटर सलीम दुर्रानी की पत्नी रेखा श्रीवास्तव…जो कभी बड़े-बड़े बंगलो में रही दुबई में एयरलाइंस चलाई उनके पति देश के बड़े क्रिकेटर थे आज दर-दर की ठोकरे खा रही है pic.twitter.com/y4Rw2tTGy4
— Danish Khan (@danishrmr) December 16, 2025
व्हायरल व्हिडिओतील महिलेचं नाव रेखा श्रीवास्तव असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये त्या आत्मविश्वासात इंग्रजी आणि हिंदी भाषेत बोलताना दिसतात. त्या दुबईत वास्तव्यास असल्याचा, आलिशान आयुष्य जगल्याचा आणि स्वतःची विमान कंपनी चालवत असल्याचा दावा करतात. याचबरोबर, आपण दिवंगत क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचंही त्या सांगतात. बेलापूर मेट्रो स्टेशन परिसरात अत्यंत नाजूक अवस्थेत आढळलेल्या या महिलेने दुराणी यांच्याबाबत अनेक आठवणी आणि किस्से सांगितले आहेत.
रेखा श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आयुष्यात अचानक एक दुःखद वळण आलं. आर्थिक संकटामुळे सर्व काही विकण्याची वेळ आली. स्वतःचा बंगला, संपत्ती, सगळं गमावल्याचा दावा त्यांनी केला आहे. २०२३ मध्ये निधन झालेले सलीम दुराणी देशभर क्रिकेट खेळायचे, त्या काळात त्यांनी अनेक मोठ्या व्यक्तींशी संपर्क असल्याचंही त्या सांगतात. मात्र, या सर्व दाव्यांबाबत अद्याप सलीम दुराणी यांच्या कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या महिलेच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काही जण दाव्यांच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. नेमकी ही महिला कोण आहे, तिचे दावे कितपत खरे आहेत, याबाबत स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही.
सलीम दुराणी कोण होते?
भारतीय क्रिकेटमधील एक अष्टपैलू आणि रंगतदार व्यक्तिमत्त्व म्हणून सलीम दुराणी यांची ओळख होती. ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानातील काबूल येथे त्यांचा जन्म झाला. पुढे ते जामनगरला स्थायिक झाले. काही षटकांत सामन्याचं नशीब बदलण्याची क्षमता असलेले दुराणी भारताच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणले जातात.
१९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी कोलकाता आणि चेन्नई येथील कसोटी सामन्यांत अनुक्रमे आठ आणि दहा विकेट्स घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी एकमेव कसोटी शतक झळकावले, तर क्लाइव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स यांसारख्या दिग्गजांना शून्यावर बाद करण्याचा पराक्रमही त्यांनी केला. २९ कसोटी सामन्यांत १,२०२ धावा आणि ७५ विकेट्स अशी त्यांची कामगिरी होती. अर्जुन पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले.
वयाच्या ८८व्या वर्षी जामनगर येथे त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या नावाभोवती पुन्हा एकदा चर्चा रंगली असली, तरी ती त्यांच्या क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा एका व्हायरल व्हिडिओतील दाव्यांमुळे आहे. या प्रकरणातील सत्य काय, हे पुढील काळात स्पष्ट होईलच; मात्र सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि त्यातून उभे राहिलेले प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.


