वसई प्रतिनिधी
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये नातेसंबंधाला काळिमा फासणारी हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच सख्ख्या मामाने धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नायगाव-भाईंदर रेल्वेमार्गावर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रवाशांनी हा प्रकार पाहताच आरोपीला घटनेच्या ठिकाणीच पकडले आणि नायगाव स्टेशनवर उतरवून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपासासाठी त्याला वाळीव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
१५ नोव्हेंबरपासून बेपत्ता, १७ ला मृतदेह सापडला
अल्पवयीन मुलगी १५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह नायगाव-भाईंदर दरम्यान रेल्वे रुळांवर आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या २४ तासांत मामा-पुतणीतील धक्कादायक ‘प्रेमसंबंध’ उघडकीस आले.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन सोनी (२०) हा कोमलसोबत चर्चगेट-विरार लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात प्रवास करत होता. नायगाव स्टेशनजवळ दोघे दरवाज्याजवळ उभे असताना अर्जुनने अचानक कोमलला मागून जोरदार धक्का दिला. कोमल खाली कोसळताच तिचा जागीच मृत्यू झाला.
भाची ‘ओझे’ ठरेल, या भीतीने घेतला जीवघेणा निर्णय
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन कोमल आणि तिच्या मामामध्ये अनुचित प्रेमसंबंध होते. कोमल कुणालाही न सांगता मामाकडे गेल्यानंतर ती स्वतःसाठी ‘ओझे’ ठरेल, या भीतीने अर्जुनने तिची हत्या करण्याचे ठरवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोमल मुंबईत मानखुर्द येथे आई आणि भावासोबत राहत होती. तिची आई रुग्णांची देखभाल करणारे काम करते. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. दरम्यान ती वाळीव येथील मामाच्या घरी गेल्याचे समजताच मावशी तिला घरी आणण्यासाठी तिथे पोहोचली. मात्र, कोमल पुन्हा बेपत्ता झाली. त्यानंतर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी आरोपीनेच मुलीच्या आईला फोन करून कोमल आपल्यासोबत असल्याची माहिती दिली. त्याच दिवशी त्याने तिला लोकलमध्ये बसवून थेट मृत्यूच्या दारी ढकलले.
वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार, त्यानंतर आत्महत्या
या प्रकरणाने आणखी धक्का बसावा अशी माहिती तपासातून समोर आली आहे. गेल्या वर्षी कोमलने आपल्या वडिलांविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनांनंतर कोमल वारंवार वसई येथे जात असे. याच दरम्यान तिच्या मामाशी तिचे जवळीक वाढत गेली.
पोलीस कोठडी सुनावली
कोमलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भाईंदर येथील टेंभा रुग्णालयात करण्यात आले. आरोपी अर्जुनला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे


