मुंबई प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून युती-आघाड्यांबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती जवळपास निश्चित मानली जात असताना, या समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसचा समावेश होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकांतील विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना-मनसे युतीसोबत इतर विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपविरोधात प्रभावी लढा उभारता येईल, असा प्रस्ताव राऊत यांनी पवारांसमोर मांडल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चर्चेत काँग्रेसच्या भूमिकेवरही विचारविनिमय झाला. संभाव्य आघाडीत काँग्रेस सहभागी होणार का, याबाबत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची गरज असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षांमधील समन्वयासाठी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
दरम्यान, युतीच्या जागावाटपाबाबत शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. आधी शिवसेना आणि मनसे यांनी आपापसातील जागावाटप निश्चित करावे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असलेल्या जागांचा प्रस्ताव मांडण्यात येईल, असे पवार यांनी सांगितल्याचे समजते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक संख्येने जागा मिळाव्यात, अशी अट त्यांनी ठामपणे मांडल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
या भेटीनंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील समन्वय कसा घडतो, यावर राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.


