
वृत्तसंस्था लॉस एंजेलिस
तिसऱ्या वर्षात पदार्पण करताच जगाचे लक्ष वेधणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८चा अधिकृत कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, १५ ते ३० जुलैदरम्यान ही क्रीडा महाकुंभाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. भव्य उद्घाटन सोहळा १४ जुलै रोजी संध्याकाळी ८ वाजता एलए मेमोरियल कोलिसियम आणि सो-फाय स्टेडियम या ऐतिहासिक स्थळांवर एकत्रितपणे पार पडणार आहे.
भारतासाठी ही स्पर्धा केवळ सहभागाची नसून, ‘सुवर्ण स्वप्न’ साकारण्याची संधी ठरणार आहे. यासाठी भारतीय क्रीडापटूंच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली असून, विविध खेळांमध्ये पदकांच्या नव्या आशा उजळल्या आहेत.
क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन!
१२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत असून, पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये ही टी-२० शैलीतील झुंज पाहायला मिळणार आहे. महिलांची स्पर्धा १२ ते २० जुलैदरम्यान, तर पुरुषांची स्पर्धा २२ जुलैपासून रंगणार असून अंतिम सामना २९ जुलैला होणार आहे. सर्व सामने फेअरग्राऊंड्स क्रिकेट स्टेडियम, पोनोमा येथे खेळवले जातील.
हॉकीतून इतिहासाची पुनरावृत्तीची आशा
भारताला ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ८ सुवर्णपदके देणाऱ्या हॉकीकडे यंदाही देशवासीयांचे विशेष लक्ष लागले आहे. कार्सन फील्ड येथे पुरुष व महिला हॉकी सामने १२ ते २९ जुलैदरम्यान पार पडणार आहेत.
नेमबाजीत पुन्हा एकदा लक्ष्य पदकांवर
पारंपरिक बलस्थान असलेल्या नेमबाजी स्पर्धा १५ जुलैपासून सुरू होणार असून, लाँग बीच टार्गेट शूटिंग हॉल येथे भारताचे शार्पशूटर्स आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या पुनरावृत्तीची सर्वांना अपेक्षा आहे.
अॅथलेटिक्समध्ये नीरजचा टाकावू फेकणार इतिहास
भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा यंदाही अॅथलेटिक्समध्ये सुवर्णासाठी सज्ज झाला आहे. १५ ते २४ जुलैदरम्यान एल.ए. मेमोरियल कोलिसियम येथे अॅथलेटिक्स स्पर्धा रंगतील. नीरजसोबतच अन्य भारतीय धावपटूंनाही मोठ्या संधी आहेत.
कुस्ती व बॅडमिंटनमध्ये पदकांची नव्हे, पदकांचा ‘पाऊस’ अपेक्षित
कुस्ती स्पर्धा २४ ते ३० जुलैदरम्यान एल.ए. कन्वेन्शन सेंटर हॉल २ मध्ये रंगणार असून, २००८ पासून भारताची पदकखात्यातली खात्रीची शर्यत म्हणून कुस्तीला ओळख मिळाली आहे. दुसरीकडे, बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्त्विक-चिराग यांच्या कामगिरीकडे देशभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ही सामने गेलेन सेंटर येथे होतील.
अन्य खेळांमध्येही चमक दाखवण्याचा निर्धार
टेबल टेनिस, टेनिस, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग, स्क्वॉश, तिरंदाजी यासारख्या विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी मागील वर्षांतील जागतिक कामगिरीतून आशा निर्माण केली आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक हा भारतासाठी केवळ स्पर्धा नसून, जागतिक क्रीडांगणावर आपली छाप पाडण्याची सुवर्णसंधी आहे. तयारी सुरू झाली आहे – आता उरली आहे केवळ ‘भारत विजयाचा नारा’!