
मुंबई प्रतिनिधी
पश्चिम बंगालमधील स्थानिक बुकी मिथुन चक्रवर्ती याची हत्या करून मुंबईत लपून बसलेल्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वांद्रे पूर्व, खेरवाडी परिसरातून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रबिउल मिया उर्फ बाबू (३४) असून तो पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मोहम्मदपूर, नलगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बन्सीहारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिथुन चक्रवर्ती याची पाच जणांनी मिळून हत्या केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी मुंबईतील खेरवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शेडगे आणि पोलीस शिपाई विनोद भाडले, दीपक खेडकर, धर्मेंद्र जुवाटकर यांनी कारवाई करत रबिउल मियाला अटक केली.
चौकशीत रबिउलने मिथुन चक्रवर्तीच्या खुनात सहभागी असल्याची कबुली दिली. तो गुन्हा घडल्यापासून फरार होता आणि गेल्या दोन महिन्यांपासून लोणावळ्यात एका बांधकाम स्थळी मजूर म्हणून काम करत होता. १ जानेवारी २०२५ पासून तो मुंबईच्या खेरवाडी परिसरात राहत होता.