
मुंबई प्रतिनिधी
मुंबई – ई-मेल स्पूफिंगच्या प्रकरणात माटुंगा पोलिसांनी नायजेरियन नागरिक अडोल्फस उचे ओनुमा (वय ३५, रा. खारघर, नवी मुंबई) याला अटक केली आहे.
एका महिला उद्योजिकेला रसायन व्यवसायात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. यूके येथून बनावट व्यावसायिक ई-मेल पाठवून त्यांना ‘राम ट्रेडर्स’ (अरुणाचल प्रदेश) या कंपनीकडून केमिकल सॅंपल मागवण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार महिलेकडून ₹३,०५,००० इतकी रक्कम घेतली गेली. काही दिवसांनी फक्त १ लिटरच पार्सल मिळाले आणि त्यानंतर संबंधित कंपन्यांशी संपर्क साधता न आल्याने फसवणुकीचा संशय बळावला.
महिलेकडून माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीवर याआधीही आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये सायबर गुन्ह्यांचे आरोप असल्याचे उघड झाले. तांत्रिक तपासाअंती संबंधित मोबाईल क्रमांक खारघर येथून वापरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
अटक केल्यानंतर चौकशीत आरोपीचा थेट सहभाग असल्याची कबुली मिळाली असून न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी केला असून माटुंगा सायबर टीमचे पो.उ.नि. प्रवीणकुमार पाटील, पो.हे. संतोष पवार व पो.शि. गोविंद शिरगिरे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.