सातारा प्रतिनिधी
रायगड-सातारा सीमेवरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत युवकांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले. दुःखाने खचलेल्या कुटुंबीयांना धीर देताना “या कठीण प्रसंगी मी प्रत्येक कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार,” असा शब्द त्यांनी दिला.
रविवारी मध्यरात्री आंबेनळी घाटात भरधाव स्कॉर्पिओ वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मर्ढे, आसगाव आणि खटाव परिसरात शोकसागर उसळला असून गावागावांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे, महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण आणि संदीप काटकर यांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळपासून उदयनराजे भोसले यांनी मृत युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अचानक ओढवलेल्या या दुःखामुळे अनेक कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. अनेक ठिकाणी महिलांचा हंबरडा फुटला होता, तर युवकांच्या मित्रपरिवारालाही अश्रू अनावर झाले होते.
कुटुंबीयांशी संवाद साधताना उदयनराजेंनी प्रत्येक घटनेची माहिती जाणून घेतली. “तरुण मुलं अशा प्रकारे आपल्यातून निघून जाणं ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या कुटुंबांवर कोसळलेलं दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार,” असे त्यांनी सांगितले.
सांत्वन भेटीदरम्यान गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत दिवंगत युवकांना श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर गावांमध्ये दिवसभर शोकसभांचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर आंबेनळी घाटातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घाटातील धोकादायक वळणे, अपुऱ्या संरक्षण भिंती, रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशयोजना आणि इशारा फलकांचा अभाव याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनीही प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला. “आंबेनळी घाटात वारंवार अपघात घडत आहेत. केवळ चौकशा करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. संरक्षण भिंती, रस्त्यांची दुरुस्ती, योग्य दिशादर्शक फलक आणि धोकादायक ठिकाणी विशेष सुरक्षा यंत्रणा उभारली गेली पाहिजे,” असे ते म्हणाले.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला असून, मृत युवकांच्या अंत्यसंस्कारावेळी गावागावांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तरुणांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, “आता तरी आंबेनळी घाट सुरक्षित करा,” अशी मागणी जोर धरू लागली आहे.


