सातारा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे आसगाव, मर्ढे आणि खटाव या गावांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्येक गावात शोकमय शांतता पसरली होती, तर अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसत होते.
हे सर्व युवक मित्रमंडळीसोबत कर्दे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. आनंदाच्या सहलीसाठी गेलेल्या या तरुणांवर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच अनेकांचा मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात या दुर्घटनेनंतर शोककळा पसरली.
अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार, दरीतील अवघड भौगोलिक परिस्थिती आणि सततचा धोका यांचा सामना करत बचाव पथकाने तब्बल अनेक तास रेस्क्यू ऑपरेशन राबवले. खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक, पोलीस आणि ट्रेकर्सनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. जवळपास २२ तास चाललेल्या या बचाव मोहिमेनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मृतांपैकी पाच युवक आसगाव येथील असल्याने संपूर्ण गावात शोकसागर उसळला. सोमवारी मध्यरात्री उशिरा मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. आई-वडिलांचा आक्रोश, मित्रांचे अश्रू आणि ग्रामस्थांची हळहळ पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावातील अनेकांनी आपल्या घरांबाहेर दिवे बंद ठेवून शोक व्यक्त केला.
यानंतर दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमधून मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यात आले. संपूर्ण गाव या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. “अमर रहे”च्या घोषणांमध्ये आणि अश्रूंनी भरलेल्या वातावरणात एकाचवेळी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चितांना अग्नी देताना नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.
मर्ढे येथील दोन तरुणांवर तसेच खटाव येथील एका युवकावर पहाटेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळीही गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत तरुणांना अखेरचा निरोप दिला. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, तर गावातील वातावरण पूर्णपणे शोकमग्न झाले होते.
या दुर्घटनेने सातारा जिल्हा हादरला असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांना धीर देत प्रशासनाने घाटातील धोकादायक वळणांवर तातडीने सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.


