सातारा प्रतिनिधी
पाटण : जलसंपदा विभागाच्या बिबी (ता. पाटण) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असताना धरणातून होणाऱ्या गळतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बिबी येथे १९९९-२००० मध्ये ०.०९२ टीएमसी क्षमतेच्या लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ११.२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले, तर २०२२-२३ मध्ये ३३.८६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला. आतापर्यंत एकूण ४५.१ कोटी रुपये खर्च होऊनही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही.
बिबी, सुरूल आणि म्हावशी परिसरातील सुमारे ६७८ हेक्टर क्षेत्राला या प्रकल्पातून सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या भिंतीतून सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून, साठवलेले पाणी वाया जात आहे. यावर्षी प्रथमच प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला होता. मात्र, गळतीमुळे पूर्ण क्षमतेने पाणी साठवणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, काही किरकोळ दुरुस्तीची कामे बाकी आहेत. उजवा व डावा कालवा अद्याप पूर्ण झालेला नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा अपेक्षित लाभ मिळत नाही. बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, धरणातील गळतीची दखल घेत जलसंपदा विभागाने ठेकेदाराला दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. “रबर सीलमधून पाणी गळती होत आहे. गळती दूर करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल,” अशी माहिती सहाय्यक अभियंता रोहित कोळी यांनी दिली. शेतकऱ्यांनी मात्र गळती तातडीने थांबवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


