मुंबई प्रतिनिधी
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर संबंधित केबिन क्रू सदस्य पिंकी माली यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जय पवार त्यांच्या घरी गेले. कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर खाली उतरताना लिफ्टमधून आवाज आल्याने त्यांनी खबरदारीचा निर्णय घेत १८ मजले पायऱ्यांनी उतरल्याची घटना घडली.
पिंकी माली या अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी त्याच विमानात केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. अपघातानंतर प्रथमच पवार कुटुंबीय त्यांच्या घरी पोहोचले. या भेटीत जय पवार यांनी माली यांच्या आईची प्रकृती विचारपूस केली तसेच त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला.
कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर जय पवार लिफ्टने खाली येत होते. मात्र लिफ्टमधून अनपेक्षित आवाज आल्याने त्यांनी तत्काळ लिफ्टचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला आणि १८ मजले पायऱ्यांनी चालत खाली उतरले. विमान दुर्घटनेनंतर पवार कुटुंबीय अधिक सावधगिरी बाळगत असल्याचे या प्रसंगातून दिसून आले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना जय पवार म्हणाले, “पिंकी माली यांच्या आईची अलीकडेच शस्त्रक्रिया झाली असून त्या कालच घरी परतल्या आहेत. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. मूल आणि आई-वडिलांचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं असतं. हे दु:ख सहजासहजी विसरता येणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “त्यांची प्रकृती अजूनही स्थिर नाही. मी डॉक्टरांशी बोललो असून त्यांना उद्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. तिथे त्यांच्यावर योग्य उपचार होतील.”
विधानभवनात या प्रकरणावर चर्चा होत नसल्याबाबत विचारले असता जय पवार म्हणाले, “या विषयावर मी फार काही बोलू शकत नाही. सर्वांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. रोहित पवारही याबाबत माहिती गोळा करत आहेत. महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “दादा असते तर त्यांनी तपास यंत्रणांवर विश्वास ठेवला असता. ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती समोर आल्यानंतरच नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल. जोपर्यंत तपास यंत्रणा अधिकृत माहिती देत नाहीत, तोपर्यंत काहीही बोलणं योग्य ठरणार नाही.”
जय पवार यांनी पुढे सांगितले की, “पुढील आठवड्यात मी सर्व बाबींवर सविस्तर बोलणार आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. सगळी खरी माहिती आणि तथ्य समोर आल्यानंतरच पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


