मुंबई प्रतिनिधी
मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना देशातील एलपीजी (LPG) गॅसच्या उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. मात्र, केंद्र सरकारने घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
तरीही काही शहरांमध्ये गॅस सिलिंडरची वेळेवर डिलिव्हरी होत नसल्याच्या, तसेच वितरकांकडून मनमानी केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी थेट संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुकिंग नियमात बदल; आता २५ दिवसांची अट
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग प्रक्रियेत केंद्र सरकारने अलीकडेच महत्त्वाचा बदल केला आहे. पूर्वी एका सिलिंडरनंतर पुढील बुकिंगसाठी २१ दिवसांचा कालावधी होता. मात्र, आता हा कालावधी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे.
यामुळे काही भागांत तांत्रिक कारणांमुळे डिलिव्हरी प्रक्रियेत विलंब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु, जर वितरक जाणूनबुजून सिलिंडर देण्यास उशीर करत असेल किंवा ग्राहकांकडून जादा पैसे मागत असेल, तर ते नियमबाह्य असून त्याविरोधात तक्रार करता येते.
वितरकांची मनमानी असल्यास थेट कंपनीकडे तक्रार
ग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी प्रमुख गॅस कंपन्यांनी स्वतंत्र टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. सिलिंडर उशिरा मिळणे, जादा दराची मागणी, गॅस चोरीची शंका किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास या क्रमांकांवर तक्रार करता येते.
प्रमुख एलपीजी कंपन्यांचे हेल्पलाईन क्रमांक
१) इंडेन गॅस (Indane Gas)
• टोल-फ्री हेल्पलाईन : 1800-2333-555
• एलपीजी बुकिंग व तक्रार : 7718955555
२) भारत गॅस (Bharat Gas)
• टोल-फ्री हेल्पलाईन : 1800-22-4344
• एलपीजी बुकिंग नंबर : 7715012345
३) एचपी गॅस (HP Gas)
• टोल-फ्री हेल्पलाईन : 1800-2333-555
• ‘Anytime LPG’ सेवा : 9493602222
एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध
तज्ज्ञांच्या मते, सध्या देशात घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर केंद्र सरकार आणि तेल कंपन्या बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना गॅसच्या पुरवठ्यात अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
गॅस टंचाईच्या अफवा पसरत असल्याने काही ठिकाणी ग्राहकांकडून घाईघाईने बुकिंग करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. मात्र, तज्ज्ञांनी नागरिकांना ‘पॅनिक बुकिंग’ टाळण्याचे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जर वितरकाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर ग्राहकांनी आपले हक्क वापरून संबंधित कंपनीच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहे.


