
नवी मुंबई प्रतिनिधी
बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आला. या निमित्ताने पार पडलेल्या भव्य समारंभात मोदींनी देशवासीयांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन करत “देशाचं सामर्थ्य देशातच ठेवूया” असा संदेश दिला.
समारंभाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोदी म्हणाले, “नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा केवळ विमानतळ नाही, तर या संपूर्ण भागाच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देणारा प्रकल्प आहे. कमळाच्या आकाराची रचना म्हणजे संस्कृती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या प्रकल्पामुळे उद्योगांना चालना मिळेल, स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.”
पंतप्रधानांनी यावेळी देशातील विमानसेवेच्या झपाट्याने वाढत्या क्षमतेचाही आढावा घेतला. “२०१४ मध्ये देशात फक्त ७४ विमानतळं होती. आज त्यांची संख्या १६० वर पोहोचली आहे. लहानशा शहरांमध्ये विमानतळं झाल्याने प्रवासाचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. हवाई प्रवासाची मागणी इतकी वाढली आहे की सध्या एक हजार विमानांची ऑर्डर प्रलंबित आहे. त्यामुळे पायलट, कॅबिन क्रू, देखभाल व सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे,” असे ते म्हणाले.
स्वदेशीच्या महत्त्वावर भर देत मोदी म्हणाले, “आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा फक्त वस्तू विकत घेत नाही, तर देशाचा भविष्यकाळ ठरवतो. देशात तयार झालेल्या वस्तूंवर प्रत्येकाने अभिमान बाळगावा. स्वदेशी वस्तू खरेदी केल्याने पैसा देशातच राहील, उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार वाढेल. देशातलं टॅलेंट देशाबाहेर न जाता देशातच उपयोगात आलं पाहिजे.
मोदींच्या या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळ्यानंतर विमानतळ परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम व प्रकाशझोताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नवा अध्याय उजळून निघाला.