
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबईत आज (१० ऑक्टोबर) सकाळपासूनच प्रवाशांची अक्षरशः धावपळ सुरू झाली. रिक्षा स्टॅण्डवर शुकशुकाट, स्थानकांबाहेर लांबच लांब रांगा आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट रिक्षाचालकांच्या एकदिवसीय संपाचा फटका आज सकाळी सर्वसामान्यांना बसला.
बाईक टॅक्सी सेवेला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी आज राज्यभर बंद पुकारला आहे. नवी मुंबईतील वाशी, सानपाडा, नेरुळ, सीवूड्स आणि बेलापूर परिसरात सकाळपासून अनेक रिक्षा बंद राहिल्या. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहनं, शेअरिंग कॅब किंवा बससेवेचा आधार घ्यावा लागला. बसस्थानकांवरही मोठी गर्दी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
कोकण भवनवर आज संघटनांकडून मोर्चा आणि एकदिवसीय उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. “बाईक टॅक्सी सेवेला परवानगी तातडीने रद्द करावी, सीएनजी दरात कपात करावी, आरटीओ प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत, रिक्षाचालकांसाठी कर्जमाफी योजना लागू करावी आणि आरटीओ कार्यालयांतील भ्रष्टाचार थांबवावा,” अशा मागण्या या आंदोलनातून पुढे मांडण्यात आल्या आहेत.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाच्या धोरणांमुळे रिक्षाचालकांवर कर आणि इंधनदरांचा ताण वाढला आहे. “बाईक टॅक्सी सेवेमुळे आमच्या उपजीविकेवर गदा येत आहे. अनेक बाईक चालकांकडे परवाने वा विमा नसतानाही ते प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावरच संकट ओढवलं आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की बाईक टॅक्सी सेवेसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जात आहे. यात चालकांची पार्श्वभूमी, वाहन विमा आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या तरतुदींचा समावेश असेल.
राज्य सरकारचा दावा आहे की बाईक टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी जलद, परवडणारी आणि अल्प अंतरासाठी सोयीची ठरेल. मात्र रिक्षाचालक संघटना या सेवेला तीव्र विरोध दर्शवत असून, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रिक्षाचालकांच्या संपामुळे आज सकाळी शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक नोकरदार वर्गातील नागरिक उशिरा कार्यालयात पोहोचले, तर विद्यार्थ्यांनाही शाळा-कॉलेजच्या वेळा पाळणे कठीण झाले. परिणामी, बाईक टॅक्सी आणि रिक्षाचालक यांच्यातील हा संघर्ष आता शासनाच्या मध्यस्थीशिवाय सुटणे कठीण दिसत आहे.