
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी अभियानाला मोठं यश मिळालं असून, पवईतील एका गुप्त गोडाऊनवर साकीनाका पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४४ कोटी रुपयांचा मेफेड्रोन (एम.डी.) व रसायनांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांच्या सखोल तपासाची फलश्रुती मानली जात असून, मुंबईतील अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा हादरा बसला आहे.
३० जुलै २०२५ रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पवईमधील ‘प्रथमेश गॅलेक्सी’ इमारतीत शॉप नंबर ९ मधील गोडाऊनवर छापा टाकला. या ठिकाणी रंगांच्या वस्तूंमध्ये लपवून ठेवलेला २१.९०३ किलो मेफेड्रोन, १५९ किलो २-ब्रोमो ४ मिथाइल प्रोपिओफेनॉन आणि ३७६ किलो मोनोमेथिलामाइन अशा रसायनांसह एकूण ४३.९७ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याआधी, २४ एप्रिल रोजी साकीनाका पोलिसांनी कर्नाटकातील म्हैसूर आणि पालघर जिल्ह्यातून १९२.५३ किलो एम.डी. (किंमत – ३९० कोटी रुपये) जप्त केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात आजपर्यंत पोलिसांनी २१४ किलो एम.डी. ड्रग्जसह एकूण ४३४ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजितसिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली, डीसीपी दत्ता नलावडे, सहाय्यक आयुक्त प्रदीप मैराळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली झाली.
पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक दयानंद वणवे, पंकज परदेशी, तसेच हवालदार चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे आणि अनिल करांडे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबईतील अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात करत पोलिसांनी हजारो तरुणांचं आयुष्य अंधारात जाण्यापासून वाचवलं आहे. ही कारवाई शहरातील नशाविरोधी मोहिमेला बळ देणारी ठरत असून, पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद मानली जात आहे.