
मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा घाव घालणारी आणि राज्यभर खळबळ उडवणारी कारवाई केली आहे. तब्बल 192 किलो मेफेड्रोन (MD) ड्रग्ज जप्त करत, 390 कोटी रुपयांचा साठा उध्वस्त करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये सक्रिय असलेल्या अंमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.
सलीम लांडग्याच्या अटकेपासून कारवाईला सुरुवात
ही धडाकेबाज कारवाई 25 जुलै रोजी सुरू झाली. झोन 10 चे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बांद्रा रिक्लेमेशन येथे सलीम इम्तियाज शेख उर्फ सलीम लांडगा (45) याला ताब्यात घेतले. सलीमच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीवरून पोलिसांना एक प्रचंड अंमली पदार्थांचे जाळे कार्यरत असल्याचा सुगावा लागला.
म्हैसूरमध्ये मोठा कारखाना उघड
सलीमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हैसूरच्या रिंग रोडवरील एका इमारतीवर छापा टाकला. वरून हॉटेल किंवा गॅरेजसारखी दिसणारी ही जागा प्रत्यक्षात मेफेड्रोन तयार करण्यासाठी वापरली जात होती. या ठिकाणाहून मुंबईसह अन्य भागात ड्रग्जचा पुरवठा करण्यात येत होता. कारखान्याच्या धाडीदरम्यान 192 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
साकीनाक्यातून सुरुवात, तपास विस्तारला
या रॅकेटचा तपास एप्रिल 2025 मध्ये साकीनाका येथे 52 ग्रॅम मेफेड्रोनसह अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीपासून सुरू झाला. त्यानंतर आणखी तीन जणांना अटक झाली आणि त्यांच्याकडून 4.53 किलो मेफेड्रोन (जवळपास 8 कोटी रुपये किंमतीचे) हस्तगत करण्यात आले.
आणखी अटक होण्याची शक्यता
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी पाच आरोपी मुंबईतील आहेत. पोलिसांचा संशय आहे की, हे बहुआयामी रॅकेट देशभरात विस्तारलेले असून, आरोपींना मेफेड्रोन बनवण्याचे सूत्र कुठून मिळाले, याचाही तपास सुरू आहे. याप्रकरणात आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता आहे.
NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सर्व आरोपींविरुद्ध नारकोटिक ड्रग्ज अॅण्ड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईने अंमली पदार्थाच्या रॅकेटला जोरदार हादरा बसला असून, ड्रग्ज माफियांना मोठा इशारा मिळाला आहे.
तपास अजून सुरूच
मुंबई पोलिसांनी या कारवाईनंतर अंमली पदार्थ तस्करीविरोधात आणखी मोठ्या मोहिमा राबवण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील अंमली पदार्थ निर्मिती केंद्रांचा शोध घेऊन त्यावर कारवाई होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.