
लातूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी लातूरमध्ये जोरदार झटापट झाली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर थेट हल्ला करण्यात आला. या मारहाणीत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे जखमी झाले असून त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“शेतकऱ्यांच्या पोरांवर हल्ला झाला आहे. याची किंमत सत्ता धारींना मोजावी लागेल,” असा थेट इशारा विजय घाडगे यांनी दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत म्हटलं की, “तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवता आणि तुमचेच कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या लेकरांवर हात उगारतात. हीच का तुमची संस्कृती?”
घाडगे पुढे म्हणाले, “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्ते खेळतानाचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. हा विषय आमच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत लोकशाही मार्गाने उपस्थित केला. आम्ही त्यांना पत्त्यांचा सेट देऊन, हे पत्ते त्यांच्या घरी खेळा, विधानभवनात नव्हे, असं म्हणालो. मात्र, यानंतरच राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला चढवला.”
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अमानुष मारहाण – गंभीर आरोप
विजय घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ही अमानुष मारहाण होती. आमच्या कार्यकर्त्यांना कमरेखाली, पोटात लाथा मारल्या. चेहऱ्यावर घाव केले. पोलिसांनीही या प्रकरणी संवेदनशीलता दाखवायला हवी होती, कारण ते देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहेत.”
“आम्ही पत्ते उधळले नाहीत, ना घोषणाबाजी केली. फक्त निवेदन दिलं आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. मात्र, ही गोष्ट त्यांना न पचल्यामुळे आमच्यावर हल्ला करण्यात आला,” असेही ते म्हणाले.
“सत्तेचा माज आहे, पण आम्ही उत्तर देणार” – छावा संघटनेचा इशारा
घाडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “छावा संघटनेवर हल्ला नाही, शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला झाला आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. या हल्ल्याचं उत्तर दिलं जाईल. कृषिमंत्र्यांना बडतर्फ करा, अन्यथा हा मुद्दा अधिक तीव्र होईल.”
संपूर्ण घटनेमुळे लातूरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काळात छावा संघटना काय पाऊल उचलते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, पोलिस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका या प्रकरणी कशी राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.