
लातूर प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधाऱ्यांचा माज दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. कारण काय तर विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागण्याचे धाडस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी थेट कोपराने आणि बुक्क्यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते, तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, तो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यात सूरज चव्हाण यांची थेट मारहाणीची दृश्यं स्पष्टपणे दिसत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री सुनील तटकरे हे लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. मेळावा संपल्यानंतर छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले. “विधानसभेत गेम खेळणाऱ्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी निषेधार्थ काही ‘पत्ते’ देखील जमिनीवर टाकले.
या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन दुसऱ्या हॉलमध्ये बसलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. यात विजय घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
“सत्तेचा माज, पण हिशोब चुकता होणारच!” — विजय घाटगे यांचा इशारा
या घटनेवर प्रतिक्रिया देताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे म्हणाले, “माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणं हे आमचं लोकशाहीतलं अधिकार आहे. मात्र त्याला मारहाणीने उत्तर दिलं गेलं. ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांना असं वागवणं योग्य नाही. सत्तेचा माज काय असतो, तो आज अनुभवला. पण याचा राजकीय हिशोब अजितदादांना चुकवावा लागेल.”
या प्रकारामुळे लातूरसह संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वावर टीकेची झोड उठली आहे.
राजकीय असहिष्णुतेचं हे नवीन रूप? की विरोध दडपण्यासाठी सत्तेचा गैरवापर? असा सवाल आता उपस्थित होत आहे.