
नवी दिल्ली वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यानंतर गायक नेहा सिंग राठोड वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे नेहा राठोड विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. अभय सिंह यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आलीये.
दरम्यान, एफआयआर नोंद करण्यात आल्यानंतर नेहा सिंग राठोडने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राठोड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 10 वेगवेगळ्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयटी कायद्याचे कलम देखील जोडण्यात आले आहे.
नेहा सिंह राठोड विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 196 (1) (a), कलम 196 (1) (b), कलम 197 (1) (a), कलम 197 (1) (b), कलम 197 (1) (c), कलम 197 (1) (d), कलम 353 (1) (c), कलम 353 (2), कलम 302, कलम 152 अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नेहा सिंह राठोडची पहिली प्रतिक्रिया
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायक नेहा सिंह राठोडने प्रतिक्रिया दिली आहे. नेहा म्हणाली, माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे… आणि तो दाखल झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या लोकशाहीत एक सामान्य मुलगी प्रश्न कसे विचारू शकते! लोकशाहीचा आकार पाहा! ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, भाऊ!.. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
पुढे बोलताना नेहा म्हणाली, लखनौमध्ये माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वकील मला मदत करू शकेल का? माझ्याकडे वकिलाची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. माझ्या आयसीआयसीआय बँक खात्यात फक्त 519 रुपये आहेत, त्यापैकी मी 500 रुपये तबला वादकाला देईन आणि उद्या एक नवीन गाणे रेकॉर्ड करेन.
दुसरीकडे, एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, आक्षेपार्ह पोस्ट करून, लोक गायिका नेहा सिंग राठोड राष्ट्रीय अखंडतेवर प्रतिकूल परिणाम करत आहेत आणि धर्म आणि जातीच्या आधारावर लोकांना एकमेकांविरुद्ध गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करत आहेत. वरील एफआयआर अभय सिंग यांनी लखनौमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.