नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयातून मंगळवारी मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली. माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने सुप्रीम कोर्टात बूट फेकून खळबळ माजवणारे वरिष्ठ वकील राकेश किशोर यांना आज कोर्ट परिसरातच काही वकिलांकडून चप्पलांनी बेदम मारहाण करण्यात आली.
Lawyer Rakesh Kishore who hurled a shoe at former CJI BR Gavai attacked with slippers in Delhi Court pic.twitter.com/IgH5t4ywFP
— Bar and Bench (@barandbench) December 9, 2025
बूटफेकीनंतरही पश्चाताप नाही, वकिलांचा रोष उसळला
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट नंबर १ मध्ये खजुराहो येथील जवारी मंदिरातील मूर्तीच्या संवर्धनाशी संबंधित सुनावणीदरम्यान किशोर यांनी तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकत न्यायालयीन शिस्त मोडीत काढली होती. देशभरातून या कृत्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतरही “देवाने स्वप्नात येऊन तसे सांगितले”, असा दावा करत किशोर कोणताही पश्चाताप दाखवत नव्हते.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने तत्काळ कारवाई करत त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे ७१ वर्षीय किशोर यांचे वकिलीचे सर्व हक्क स्थगित झाले.
आज कोर्टात अचानक हल्ला
मंगळवारी सकाळी राकेश किशोर कोर्टात दाखल होताच काही वकिलांनी त्यांच्या भोवती भींकर घातला. धक्काबुक्की करत त्यांच्यावर चप्पलांनी मारहाण करण्यात आली. परिस्थिती बिघडत चालल्याचे पाहत कोर्टातील सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून किशोर यांना त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर काढले.
गवई यांनी केले होते क्षमादान
बूटफेकीनंतर माजी सरन्यायाधीश गवई यांनी मोठेपणा दाखवून किशोर यांना माफ केले होते. मात्र, न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याचा राग वकिलांच्या मनात कायम असल्याचे आजच्या घटनेवरून स्पष्ट दिसले.
२००९ पासून वरिष्ठ वकील
राकेश किशोर हे २००९ पासून बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत वरिष्ठ वकील होते. मात्र निलंबनानंतर त्यांना कोणतीही खटले लढवण्याची परवानगी उरलेली नाही.
कडकडडूमा कोर्टातील ही घटना पाहता न्यायालयातील सुरक्षितता आणि शिस्त यांच्याबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.


