
नवी दिल्ली वृत्तसंस्था
निष्पाप पर्यटक आणि स्थानिकांच्या जीवावर बेतणारा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यासाठी काश्मीरच्या खोऱ्यात संरक्षण दलांनी शोधमोहिम सुरू केली आहे.
इतकंच नव्हे, तर पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेनजीक सर्व वातावरण आणि घडामोडींवर भारतीय लष्कराकडून करडी नजर ठेवली जात आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची प्रत्येकत कृती भारतीय लष्कराला असून, देशातील सर्व संरक्षण यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर हल्ल्यानंतर आता सीमेपलिकडे म्हणजेच पाकिस्तानच्या लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईकची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचे आश्रित असणाऱ्या दहशकतवाद्यांनी भारतावर वक्रदृष्टी टाकत हल्ले केल्यानं देशावर पुन्हा एकदा हवाई हल्ला किंवा तत्सम कारवाई केली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण पाकिस्तानात सध्या प्रचंड भीतीचं वातावरण असून, भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीपोटी शस्त्रसंधीनजीक असणारी गावं रिकामी करम्यात आली आहेत. इतकंच नव्हे, तर पाकच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्यासुद्धा रद्द करत त्यांना तातडीनं सेवेत रुजू होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतावरील हल्ल्यानंतरच्या रात्रीसुद्धा पाकिस्तानमध्ये कमालीची भीती पाहायला मिळाली. परिणामी पाकच्या अनेक लढाऊ विमानांनी रात्रीच्या अंधारातही आकाशात घिरट्या घालत देशाच्या नियंत्रण रेषेनजीकच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. तिथंसुद्धा लष्करी अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरिय बैठका पार पडल्या असून, बालाकोटसारख्या हल्ल्यापासून देशाचा बचाव करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर शक्य तो सर्व आटापिटा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
इथं पाकिस्तानच्या लष्करानं दहशतीपोटी सीमेनजीक असणाऱ्या भागांमध्ये गस्त वाढवलेली असतानाच भारतातील नौदलाच्या वेस्टर्न कमांडला व संपूर्ण वेस्टर्न युद्धनौका ताफ्याला दक्षतेची सूचना देण्यात आली आहे. ज्यानंतर महत्त्वाच्या युद्धनौका उच्च दर्जाच्या तयारीसह सज्ज झाल्या आहेत.