
नवी दिल्ली वृत्तसंस्था
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक मागवण्यात आला. याचा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
उच्चायुक्तालयामध्ये केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पत्रकारांनी हा केक कशासाठी हा प्रश्न विचारला तर तो काहीच न बोलता निघून गेला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय नागरिक संतापले आहेत.
भारतामधील दिल्लीत असणाऱ्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. अशातच सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो केकचा बॉक्स उच्चायुक्तालयात घेऊन जात आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत एका युजरने लिहिले की, ‘एक मोठा केक, मीडियासमोर शांतता आणि ती वेळ जेव्हा संपूर्ण देश दु:खात आहे. जर हा जल्लोष होता तर त्याची गोपनियता का? लाजीरवाणे दृश्य’ तर आणखी एका युजरने लिहिले की, मी दिल्लीमध्ये फ्लॅट शोधत आह. पाकिस्तान उच्चायुक्तालय खरेदी करून किंवा भांड्याने देऊ शकेल काय?’, असा सवाल केला आहे.
दरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या ५ मोठ्या निर्णयांनंतर पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर शांतता पाहायला मिळाली. पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा बॅरिकेड काढून टाकण्यात आले. २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठक झाली. या बैठकीमध्ये भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अटारी चेकपोस्ट बंद केला, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली आणि भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले, पाकिस्तानी सल्लागारांना भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत आणि उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये ४ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. धर्म विचारत दहशतवाद्यांनी एक एक करत २७ जणांची हत्या केली. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.