
रायगड प्रतिनिधी
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्याने एका गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याच्या घटना ताजी असतानाच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यात घडली असून उपचाराअभावी एका 13 वर्षांच्या मुलाचा हकनाक बळी गेला आहे.
रायगड जिल्ह्यातील ता.म्हसळा,घुम येथील गर्वांग गायकर असे मृत मुलाचे नाव आहे. तापाने फणफणणाऱ्या गर्वांगवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर मुजोर डॉक्टरने मुलाच्या पालकांना किरकोळ ताप असताना माणगावमध्ये आलातच कशाला? म्हसळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात जायचे ना.. 108 नंबरची अॅम्ब्युलन्स बोलवली कशी, अशी अरेरावी करून घरी पाठवले. यानंतर गर्वांगचा अवघ्या अर्ध्या तासात तडफडून मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा, अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे.
सातवीत शिकणाऱ्या गर्वांगच्या पायावर केसपुळी आल्याने शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यात आले. शनिवारी अचानक ताप भरल्याने पालकांनी रात्री 10 वाजता त्याला पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गर्वांगला ताप जास्त असल्याने डॉक्टरांनी प्रथोमपचार म्हणून सलाईन लावले आणि व पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून रात्री 12 वाजता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र रात्रपाळीच्या डॉक्टरने गर्वांगला दाखलच करून घेतले नाही.
केसपुळीमुळे ताप आल्याने रात्री बेरात्री कोण दवाखान्यात येतं का? असे उद्धटपणे पालकांना सुनावत गर्वांगला उपचार नाकारले. त्यामुळे जड अंतःकरणाने पालक तापाने फणफणणाऱ्या गर्वांगला घेऊन घरी आले. मात्र घरी येताच त्याचा मृत्यू झाला. माणगाव रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्वांगला दाखल करून तातडीने उपचार केले असते तर तो वाचला असता. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगा हकनाक जीवानिशी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.