
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनई घाट परिसरात अंगणवाडी शिक्षिकेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अश्विनी बाबूराव पाटील (५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी (ता. ४) रात्री महामार्गावरील ट्रक चालकाला पुलाखालील पाण्यात मृतदेहाचे पाय दिसल्याने पोलिसांना कळवण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या रामनगर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता, तो लोखंडी रॉड व दगडांच्या साहाय्याने बांधलेला असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर गंभीर जखम आढळून आली.
बेपत्ता झाल्यानंतर संशयास्पद संदेश
अश्विनी पाटील गुरुवारी (ता. २) गावातील एका संशयित व्यक्तीसोबत कक्केरी यात्रेसाठी गेल्या होत्या. नंतर ‘बिडी येथे काम आहे’ असे सांगून टेम्पोतून उतरल्यावर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांच्या मुलाने नंदगड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
यानंतर त्यांच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना ‘मी बंगळूरला जात आहे, सोमवारी परतेन’ असा संदेश आला. मात्र रविवारी पहाटे त्याच मोबाईलवरून ‘मला जीवाचा कंटाळा आला आहे… मी मरणार आहे’ असा आणखी एक संदेश पाठवण्यात आला. या संदेशांमागे कोणाचा हात आहे याबाबत पोलिस तपास करत असून, संशयिताच्या सहभागाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकशीनंतर संशयितास सोडले
नंदगड पोलिसांनी गावातीलच एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते; मात्र त्याच दिवशी सायंकाळी त्याला सोडण्यात आले. सध्या रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपासासाठी विशेष पथक तयार केले आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन रामनगर सरकारी रुग्णालयात करण्यात आले असून, नंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणामुळे तिनई घाट परिसरात मोठी खळबळ माजली असून, या खुनामागील धागेदोरे उलगडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.