
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. सुरूवातीला हा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात आले होते.
पण, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, वकील, प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांच्यावतीने बाजू मांडली. याप्रकरणी आता, 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. तसेच, सीआयडीला सुद्धा आरोपी करणार आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.
भारतात कोणती वसुली सुरू? सिलिंडर दरवाढीवरून राऊतांचा खोचक सवाल
’29 एप्रिलला पुढील सुनावणी’
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूसंदर्भात कोर्टाने चौकशी करावी, एवढे एकच प्रावधाण होते. पण, कोर्टाच्या चौकशीनंतर कुणी, कसा निर्णय घ्यायचा? त्याची पुढील चौकशी कशी करायची? यासंदर्भात कायदा अपुरा आहे. त्यामुळे कोर्टाला आम्ही म्हटले, ‘सूर्यवंशी हे कोर्टाच्या कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा, पुढची कारवाई जोपर्यंत विधानसभा किंवा संसद करत नाही, तोपर्यंत नियमावली तयार करावी.’ हे कोर्टाने मान्य केलेय. 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.”
सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकार आरोपी
“एसआयटी नेमण्यात यावी. ही एसआयटी सरकार नाहीतर कोर्ट नेमेल. ती एसआयटी कोर्टाच्या अधिपत्याखाली काम करेल, अशी मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात कोर्ट काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे आहे. सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकार आरोपी आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलो
“राज्य सरकारला प्रतिवादी केले आहे. कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत. चार वर्षात 876 जणांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यापैकी कमी जणांना न्याय मिळाला आहे. पुढे काय करायचे? हेच स्पष्ट नाही. परंतु, कायदा बनवून घेऊ, असे आम्हाला वाटते. सीआयडीने चौकशी केली होती. पुढील सुनावणीवेळी सीआयडीला आरोपी म्हणून कोर्टात आणणार आहोत,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.