
अकोला प्रतिनिधी
अकोला-वाशिम महामार्गावर भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदेंनी तातडीने स्थानिक कार्यकर्त्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. मात्र काही तासांतच हा संपूर्ण प्रकार फसवा असल्याचे स्पष्ट झाले. पैशांसाठी उभारलेला हा नवा गंडा उघड झाल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदेंनी आदेश दिल्यानंतर माजी आमदार व अकोल्याचे संपर्कप्रमुख गोपिकिशन बाजोरिया आणि जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पातुरच्या दिशेने तब्बल 42 किलोमीटरपर्यंत पाहणी करूनही कोणताही अपघात झाल्याचे निदर्शनास आले नाही. दरम्यान, कॉल करणारी व्यक्ती वारंवार वेगवेगळी ठिकाणे सांगत राहिली. इतकेच नव्हे तर त्याने ‘फोनपे’द्वारे आर्थिक मदतीची मागणीही केली. यामुळे संशयाचे धुके अधिक गडद झाले.
शेवटी हा कॉल पूर्णपणे खोटा असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधिताने आपला मोबाईल क्रमांक बंद करून टाकला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने आपले नाव प्रमोद फसाले असे सांगितले होते. थेट राज्याचे उपमुख्यमंत्री यांना लक्ष्य करून पैशासाठी गंडा घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे खळबळ उडाली असून खरी गरज असताना अपघातग्रस्तांना मदत पोहोचण्यात होणाऱ्या अडथळ्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून फसव्या कॉलमागील व्यक्तीचा शोध घेणे हे आव्हान अकोला पोलिसांपुढे आहे.