
सातारा प्रतिनिधी
साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा नव्या उजेडात झळकणार आहे. किल्ले अजिंक्यतारा, माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी परिसर आणि घाट विकास, तसेच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर या महत्त्वाच्या वारसास्थळांच्या सुशोभीकरणासाठी तब्बल २६८ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर झाला.
या प्रस्तावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबईत मंगळवारी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री नीतेश राणे, शिवेंद्रसिंहराजे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत दोन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी १३५ कोटी रुपये, तर माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी परिसरासाठी १३३ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. या निर्णयामुळे साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाला पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केला.
मंजूर निधीचा तपशील
• किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण – ₹१३५ कोटी
• महाराणी ताराराणी समाधी परिसर विकास (माहुली) – ₹१३३ कोटी
• छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर (मालवण) – ₹९० कोटी ८१ लाख
• संगम माहुली घाट विकास – ₹१३३ कोटी
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घाट व समाधी विकासाचा आराखडा तयार करून तो उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सादर करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश येत मंत्रालयीन बैठकीत निधीला मंजुरी मिळाली.
“ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनाच्या प्रोत्साहनासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरेल,” असे राजेंद्र चोरगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
साताऱ्याचा अभिमान असलेले अजिंक्यतारा आणि ताराराणी समाधी आता नव्या रूपात पर्यटकांना आकर्षित करणार आहेत.