
पुणे प्रतिनिधी
पुणे : शहरातील येरवडा परिसर पुन्हा एकदा दहशतीने हादरला आहे. लक्ष्मीनगर भागात रविवारी सकाळी घडलेल्या घटनेत चार तरुणांनी भरदिवसा थेट घरात घुसून माय–लेकरावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या निर्घृण प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रहीसा महंमद शेख (४४, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी जहुर शेख (२८), सुलतान खान (२०), आझाद खान (२२) आणि मुस्तफा खान (२१) हे चौघे रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” अशी विचारणा करत जहुर शेख याने तलवार काढून रहीसा शेख यांच्यावर हल्ला चढवला. त्यांचा मुलगा साजिद शेख यालाही तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.
हल्ल्यादरम्यान इतर आरोपींनी घरात घुसून फर्निचर फोडले, वस्तूंचे नुकसान केले, गलिच्छ शिवीगाळ केली आणि महिलेला धमक्या दिल्या. काही मिनिटांतच घरात रक्तपात, तोडफोड आणि आरडाओरड सुरू झाली. शेजाऱ्यांनी धावत येऊन पाहिले तेव्हा घरात रक्ताचे थारोळे आणि उद्ध्वस्त वस्तू पाहून तेही स्तब्ध झाले.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोपींवर हत्या करण्याचा प्रयत्न (कलम ३०७), घरात घुसखोरी (कलम ४५२), मारहाण (कलम ३२३), शिवीगाळ (कलम ५०४), धमकी (कलम ५०६) आणि एकत्र गुन्हा करण्याचा कट (कलम ३४) अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू असून, जुना वाद की वैयक्तिक राग हे प्रकरणामागे कारणीभूत आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत. हल्ल्यात वापरलेली तलवार जप्त करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड संताप आहे. “पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या घरात घुसून तलवारीने हल्ला करणे म्हणजे कायदा,सुव्यवस्थेची घोर पायमल्ली आहे,” अशा शब्दांत सामान्य पुणेकरांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.