पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या स्पष्टवक्तेपणाने, कामाचा प्रचंड झपाटा आणि प्रशासनावरील मजबूत पकडीने वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनी सोमवारी पुणे जिल्हा परिषदेचा परिसर भावूक झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी अमित शाह यांनी अजितदादांच्या स्वभावातील त्यांना सर्वाधिक आवडणारा गुण सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर, अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. ‘दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला,’ असे म्हणताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या प्रसंगाने संपूर्ण व्यासपीठ भावूक झाले.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कृषिमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय आणि विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
‘होय तर होय, नाही तर नाही’; अमित शाहांना भावला दादांचा स्पष्टवक्तेपणा!
अमित शाह यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील एका महत्त्वाच्या गुणाचा विशेष उल्लेख केला. अजितदादा जे मनाला पटायचे ते स्पष्टपणे मान्य करायचे आणि जे पटायचे नाही त्याला थेट नकार द्यायचे. त्यांच्या बोलण्यात कोणताही आडपडदा नसायचा. महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाही ते आपली भूमिका ठामपणे मांडायचे. होय म्हणजे होय आणि नाही म्हणजे नाही, अशी त्यांची स्पष्ट भूमिका असायची. अजित पवार यांचा हाच स्पष्टवक्तेपणा आपल्याला सर्वाधिक आवडायचा, असे अमित शाह यांनी सांगितले.
अजित पवार हे केवळ महायुतीतील सहकारी नव्हते, तर आपले मित्रही होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे, अशा शब्दांत शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांसाठी फडणवीस-शिंदेंशीही घालायचे वाद!
अजित पवार यांच्या नेतृत्वशैलीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू अमित शाह यांनी उलगडला. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी अजितदादा अनेकदा आपल्यासोबत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करताना ठाम भूमिका घ्यायचे. आपल्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षातील नेत्यांसाठी लढणारे नेते फार कमी असतात. मात्र, अजित पवार यांनी नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांचा विचार केला. त्यांना काय हवे, त्यांच्या अडचणी काय आहेत, याकडे त्यांचे लक्ष असायचे, असे शाह यांनी सांगितले.
कोरोना काळात सकाळी सात वाजताच फोन!
अजित पवार यांच्या कामाच्या शिस्तीचा आणि वेळेच्या नियोजनाचा किस्साही अमित शाह यांनी सांगितला. कोरोना महामारीच्या कठीण काळात महाराष्ट्रातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज होती. त्या काळात अनेकदा सकाळी सात वाजताच अजित पवार यांचा लँडलाईनवर फोन यायचा. एवढ्या सकाळीही ते कामासाठी पूर्णपणे तयार असायचे. प्रशासनातील कामे, सहकार क्षेत्रातील प्रश्न आणि साखर कारखानदारांच्या अडचणी याबाबत त्यांच्याशी चर्चा व्हायची. कामाबाबत त्यांची असलेली तत्परता आणि बांधिलकी यातून दिसून येत होती, असे शाह यांनी नमूद केले.
अजित पवार यांचे सकारात्मक व्यक्तिमत्त्व, प्रशासनावरील पकड, सहकार क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि ग्रामीण महाराष्ट्राशी असलेली घट्ट नाळ यांचेही त्यांनी कौतुक केले.
‘दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला’; सुनेत्रा पवार भावुक!
या सोहळ्यात सर्वाधिक भावनिक क्षण सुनेत्रा पवार यांच्या भाषणावेळी पाहायला मिळाला. अजित पवार यांच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास केला. मात्र, पद कितीही मोठे झाले तरी त्यांनी आपली काम करण्याची पद्धत बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांना बहुजन समाजातील लोकांविषयी विशेष आपुलकी होती. त्यांचे अमित शाह यांच्यावरही विश्वासाचे नाते होते. त्यांना झाडे, निसर्ग आणि पर्यावरणाविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.
‘मी खचणार नाही, मागे तर अजिबात वळून पाहणार नाही. अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालत त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. शेतकऱ्यांना कधीही एकटे सोडणार नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मात्र, दादांच्या आठवणी सांगताना ‘त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला,’ असे म्हणताच उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या.
पुतळ्यासोबतच छायाचित्र दालनातून आठवणींना उजाळा
या कार्यक्रमात केवळ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नाही, तर पुणे जिल्ह्याच्या विकासात अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाची आठवण पुढील पिढ्यांना व्हावी, या उद्देशाने विशेष छायाचित्र दालनही उभारण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘अजित पवार प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट आणि कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन करण्यात आले.
अजित पवार यांच्या राजकीय प्रवासातील अनेक चढ-उतार, विकासकामांसाठी घेतलेले निर्णय, सहकार क्षेत्रातील योगदान आणि सामान्य कार्यकर्त्यांशी असलेले नाते यांची आठवण या सोहळ्यातून पुन्हा एकदा जागी झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे नेते एकत्र आले आणि दादांच्या कार्याला अभिवादन केले. पुतळ्याच्या अनावरणाचा हा सोहळा केवळ स्मारकापुरता मर्यादित न राहता अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव करून देणारा ठरला.


