पुणे प्रतिनिधी
पोलिओमुक्त भारताचा संकल्प कायम ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज झाली असून, शहरात येत्या रविवारी (ता. २२) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील तब्बल तीन लाख १६ हजार २७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, शहराच्या विविध भागांत १ हजार ३६७ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. शहरातील झोपडपट्ट्या, निवासी वसाहती, बांधकाम प्रकल्प, स्थलांतरित कामगारांच्या वस्त्या तसेच दुर्गम भागांतील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन बालकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष पथकेही कार्यरत राहणार आहेत.
पोलिओचा धोका टाळण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय
पोलिओ हा विषाणूमुळे होणारा गंभीर संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे बालकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका असतो. विशेष म्हणजे, पोलिओवर विशिष्ट उपचार उपलब्ध नसल्याने प्रतिबंधात्मक लसीकरणालाच सर्वाधिक महत्त्व आहे. भारताने पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळवला असला, तरी जगातील काही देशांमध्ये पोलिओ विषाणूचे अस्तित्व अद्याप कायम आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी नियमित लसीकरणाबरोबरच पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.
आधी डोस घेतला तरी पुन्हा दोन थेंब आवश्यक!
अनेक पालकांच्या मनात नियमित लसीकरणातून पोलिओचे डोस दिले असताना पुन्हा लस देण्याची गरज काय, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, आरोग्य विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. नियमित लसीकरणाचे डोस यापूर्वी घेतले असले, तरीही पल्स पोलिओच्या विशेष मोहिमेत प्रत्येक पात्र बालकाला दोन थेंब देणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी कोणताही संभ्रम न ठेवता आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकही बालक वंचित राहू नये!
‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दर वेळी’ हे ब्रीदवाक्य घेऊन महापालिकेचा आरोग्य विभाग या मोहिमेत उतरणार आहे. केवळ लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या बालकांपुरतेच अभियान मर्यादित न ठेवता घरोघरी भेट देऊन बालकांचा शोध घेतला जाणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या पथकांना सहकार्य करावे आणि परिसरातील पात्र बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.
मोहीम एका दृष्टिक्षेपात :
लक्ष्य : ३,१६,२७५ बालके
वयोगट : शून्य ते पाच वर्षे
लसीकरण केंद्रे : १,३६७
दिवस : रविवार, २२ नोव्हेंबर
वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५
लस : पोलिओ प्रतिबंधक दोन थेंब


