मुंबई प्रतिनिधी
मुंबई : नवजात बालकाचा जन्मदाखला मिळवण्यासाठी आता पालकांना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयातून घरी परतल्यानंतर जन्मदाखल्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कार्यालयात हेलपाटे मारणे आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याच्या कटकटीतून पालकांची कायमची सुटका होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, महापालिकेच्या रुग्णालयांत जन्मलेल्या नवजात बालकांना अवघ्या तीन दिवसांत रुग्णालयातूनच जन्मदाखला उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सुविधेमुळे नवजात बालकांच्या पालकांचा वेळ, पैसा आणि विनाकारण होणारी धावपळ वाचणार आहे.
मुंबई महापालिकेने नागरिकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांना जन्म आणि मृत्यू नोंदणीचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती संबंधित महापालिका विभाग कार्यालयांकडे पाठवली जात होती. त्यानंतर विभाग कार्यालयातील नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पालकांना जन्मदाखला मिळत होता. या प्रक्रियेत अनेकदा पालकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही जन्मदाखल्यासाठी स्वतंत्रपणे कार्यालयात जावे लागत होते. आता ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णालय स्तरावरच पूर्ण केली जाणार असल्याने प्रशासकीय अडथळे दूर होणार आहेत.
२० रुग्णालयांत सुविधा; केईएम, नायर, शीव, कूपरचा समावेश
महापालिकेच्या केईएम रुग्णालय, बी.वाय.एल. नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (शीव) आणि आर. एन. कूपर रुग्णालय या चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी प्रत्येक संबंधित रुग्णालयाला स्वतंत्र संगणकीय लॉगिन आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील अधिकृत यंत्रणेलाच जन्मनोंदणीची प्रक्रिया थेट पूर्ण करता येणार आहे.
राज्य सरकारमार्फत प्रस्ताव; भारताच्या महापंजीयकाची मंजुरी
जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार रुग्णालय स्तरावर देण्यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने हा प्रस्ताव भारताच्या महापंजीयकांकडे (Registrar General of India) मंजुरीसाठी पाठवला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर रुग्णालयांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना नोंदणीचे अधिकार देण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे अनेक वर्षांपासून विभाग कार्यालयांमार्फत चालणाऱ्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण शक्य झाले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी या निर्णयाची माहिती देताना, नागरिकांचा वेळ वाचवणे आणि जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया अधिक जलद व सुलभ करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. जन्मनोंदणी पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत संबंधित बालकाचा जन्मदाखला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
डिजिटल सेवांनाही गती; भविष्यात जुन्या नोंदींचाही लाभ
महापालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्थेचे संगणकीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय महापालिकेच्या जुन्या जन्म-मृत्यू नोंदींची केंद्र सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमशी (CRS) सांगड घालण्याची योजनाही विचाराधीन आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नागरिकांना जुन्या नोंदी शोधणे, दाखले मिळवणे आणि नोंदींमधील दुरुस्ती करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
एकूणच, बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी महत्त्वाचा असलेला जन्मदाखला मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. रुग्णालयातूनच नोंदणी आणि तीन दिवसांत दाखला अशी व्यवस्था सुरू झाल्याने पालकांना महापालिकेच्या कार्यालयांचे खेटे घालण्याची गरज उरणार नाही. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाने घेतलेला हा निर्णय मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.


