पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आक्रमक, स्पष्टवक्ते आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना पुण्यात उजाळा मिळाला. पुणे जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी (१६ नोव्हेंबर) अनावरण करण्यात आले. या सोहळ्यातील पुतळ्याचे रूप विशेष लक्षवेधी ठरले. चेहऱ्यावरचे परिचित हास्य, देखणे डोळे आणि व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास यांचा सुंदर मिलाफ या पुतळ्यातून साकारण्यात आला आहे. त्यामुळे उपस्थितांना अजितदादांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण भवन परिसरात हा सोहळा पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कृषिमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याची आठवण जपण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला होता. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासाच्या कामांशी त्यांचा दीर्घकाळ जवळचा संबंध राहिला. त्यांच्या कार्याची आठवण पुढील पिढ्यांना व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
प्रवेशद्वारालाही अजित पवारांचे नाव
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण राहणार आहे. पुतळ्याच्या अनावरणासोबतच प्रवेशद्वाराच्या नामकरणाचाही कार्यक्रम पार पडला.
छायाचित्र दालन, लघुपट आणि कॉफी टेबल बुक
अजित पवार यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचे टप्पे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष छायाचित्र दालन उभारले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासून ते प्रशासकीय कामकाजापर्यंतच्या प्रवासाची झलक या दालनातून पाहायला मिळणार आहे. याशिवाय त्यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपट आणि कॉफी टेबल बुकही या उपक्रमाचा भाग आहेत. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील आठवणी आणि विकासकामांचा ठेवा जतन करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
शिंदे, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंकडून अभिवादन
या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पुतळ्याला अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली. राज्याच्या राजकारणातील वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांतील नेते एकाच व्यासपीठावर आल्याने या कार्यक्रमाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झाले.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांच्या कामाची धडाडी, निर्णयक्षमता, प्रशासनातील शिस्त आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा देणारा हा पुतळा पुणे जिल्हा परिषद परिसरातील महत्त्वाचा स्मृतिचिन्ह ठरणार आहे.


