पुणे प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुणे जिल्हा परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांसारख्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती न लावल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. सुनेत्रा पवार यांनीही यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतील महत्त्वाचे नेतेच या सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने पक्षांतर्गत काही नाराजी आहे का, अशा चर्चांना सुरुवात झाली. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील दत्ता भरणे यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
या अनुपस्थितीबाबत दत्ता भरणे यांनी स्पष्टीकरण देताना हा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेचा असून तो जिल्ह्यापुरताच मर्यादित होता. त्यामुळे इतर नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते, असे सांगितले. मात्र, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
तटकरे म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेचा हा कार्यक्रम मर्यादित जागेत, छोट्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीचा वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. गेल्या ३० वर्षांपासून पाडव्याच्या दिवशी मी बारामतीला जात आहे. यंदा दादांशिवाय दिवाळी आणि दादांशिवाय बारामती, अशा भावनेने मी बारामतीला गेलो होतो. अजितदादांच्या अपघातस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीही भेट दिली. तसेच दादांच्या आईची आणि वहिनींची भेट घेतली.
पुतळा अनावरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या इमारतीत आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आपण तेथे उपस्थित राहिलो नाही. मात्र, आपल्या अनुपस्थितीमागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याबद्दलचा आदर कालही होता, आजही आहे आणि आपल्या जीवात जीव असेपर्यंत कायम राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती आणि त्यावर दिले जाणारे खुलासे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तटकरे यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला, तरी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र कायम आहे.


